श्री. दिलीप गिरप ; 1 वर्षात नगरपरिषद कार्यक्षेत्रात एकूण 25 हजार वृक्ष लागवड होणार..
⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवार दि.५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात
वेंगुर्ला कॅम्प येथे “एकाच दिवशी 500 वृक्षलागवड” करण्यात येणार आहे, अशी माहिती वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी आज सोमवारी (1 जून ) सायंकाळी वेंगुर्ला नगरपरिषद येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती सचिन शेट्ये, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती गौरी माईणकर आदी उपस्थित होते. पर्यावरण संतुलन च्या दृष्टीने नगराध्यक्ष व अन्य नगरसेवक (एकूण 23) प्रत्येकी 10 झाडे लावणार आहेत. तर नगरपरिषद अधिकारी – कर्मचारी ( एकूण 25 ते 30) असे एकूण प्रत्येकी 10 झाडे लावणार आहेत. 5 जून रोजी सकाळी 7 वाजता या विशेष उपक्रमाचा शुभारंभ होणार असून कोकम, जांभूळ या वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. यामधून उत्कृष्ट वृक्ष देखभाल व संगोपन करणाऱ्या प्रथम 5 क्रमांकांना पुढील वर्षी (5 जून 2027) विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.वृक्ष जिओटॅगिंग करण्यात येणार असून यासाठीचे परीक्षण कृषी तज्ञ मार्फत होणार आहे. वेंगुर्ला शहरात नगरपरिषद कार्यक्षेत्रात एकूण 25 हजार वृक्ष लागवड उद्दिष्ट शासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे. पुढील वर्षी 5 जून 2027 रोजी शहरातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येकी 10 झाडे देऊन अशीच स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, असे यावेळी दिलीप गिरप यांनी बोलताना सांगितले.
