स्पेशल गाड्यांना थांबा न दिल्यास रेल रोको आंदोलन

मडुरा दशक्रोशीचा निर्णय

⚡बांदा ता.१८-: मडुरा रेल्वे स्टेशनवर गणपती विशेष गाड्यांना थांबा देण्यासाठी कोरे प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, कोरे प्रशासनाने केवळ एका गाडीला थांबा देऊन दशक्रोशीतील नागरिकांची थट्टा केली आहे. कोरे प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल या अपेक्षेने स्वातंत्रदिनी नियोजित उपोषण केले नाही. दशक्रोशीतील नागरिक व चाकरमान्यांच्या कोरे विरोधात तीव्र भावना आहेत. येत्या ८ दिवसात गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय न झाल्यास रविवार २८ ऑगष्ट रोजी सकाळपासून रेल रोको आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, कोरे प्रशासनाने सुरुवाती पासूनच मडुरा दशक्रोशीतील नागरिकांची निराशा केली आहे. स्टेशन आवारात मोठ्या प्रमाणात भूसंपादन करुनही बरीच वर्षे क्रॉसिंग ट्रॅक उभारला नाही. कोरे बरोबर बराच संघर्ष करुन स्टेशन नुतनीकरण, दुहेरी ट्रॅक, पाणी, वीज या सुविधा करुन घेतल्या. बरीच वर्षे गणपती स्पेशल सर्व गाड्यांना थांबा देण्यात येत होता. त्यामुळे हजारो प्रवासी व चाकरमान्यांची चांगली सोय झाली होती.

दोन वर्षांच्या कोरोनाच्या संकटानंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावात येण्याची शक्यता आहे. मडुरा दशक्रोशीसह बांदा तसेच पेडणे तालुक्यातील गावांना मडुरा स्टेशन कमी अंतराचे आहे. ३५ हून अधिक गावे मडुरा स्टेशनशी संलग्न आहेत. साहजिकच मडुरा स्टेशनवर सर्व गाड्यांना थांबा दिल्यास हजारो चाकरमान्यांची सोय होणार आहे.

मडुरा स्टेशन हे केवळ क्रॉसिंग स्टेशन आहे. त्याचे रुपांतर हॉल्ट स्टेशनमध्ये करावे आणि कोकण कन्या, मांडवी यां गाड्यांना थांबा मिळावा. तसेच तुतारी एक्सप्रेस मडुरा स्टेशन पर्यंत आणून सावंतवाडी येथे नेऊन हॉल्ट करून संध्याकाळी मडुरा येथून सोडण्यात यावी अशी आग्रही मागणी आहे.

कोरे प्रशासनाने येत्या ८ दिवसात सर्व गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय न घेतल्यास कोणतीही नोटीस न देता २८ ऑगष्ट रोजी रेल रोको आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतर होणार्‍या सर्व परिस्थितीला कोरे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page