⚡वैभववाडी ता.१८ संजय शेळके-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत आचिर्णे विद्यालयाची कु. श्रेया संदीप शेळके हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
भारतभर अगदी उत्साहाने व आनंदाने महोत्सव साजरा करण्यात आला. या अनुषंगाने देशभर विविध स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने वक्तृत्व निबंध व चित्रकला या स्पर्धांचे आयोजन केले होते. सदर स्पर्धा या इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी व बारावी या गटानुसार घेण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धा या केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तर या स्तरावर घेण्यात आल्या. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये इयत्ता आठवी ते दहावी या गटात निबंध स्पर्धेत यशवंतराव चव्हाण विद्यालय ची इयत्ता नववी मधील विद्यार्थिनी कुमारी श्रेया संदीप शेळके हिने प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादित केले आहे. याबद्दल तिला जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजूलक्ष्मी व मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री प्रदीप नायर यांनी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित केले आहे. याचबरोबर सदर विद्यार्थिनी ही गेली चार-पाच वर्षे निबंध व वक्तृत्व स्पर्धेत आपली छाप उमटवत आहे. तिने आजपर्यंत समता सप्ताह ,जलसाक्षरता या प्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून आपली ओळख निर्माण केली आहे. या स्पर्धेतील तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
या तिच्या यशाबद्दल तालुका गटविकास अधिकारी श्री जयप्रकाश परब, तालुका गटशिक्षणाधिकारी श्री मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी श्री अशोक वडर, लोरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गौतम तांबे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री कारेकर, शिक्षक श्री पाटील एस के, श्री तुकाराम देवकर, श्री संजय तुळसकर, श्री संदीप तुळसकर, श्री सुरेश घेरडे, श्री गणेश सावंत, श्रीम अमृता रावराणे तसेच वैभववाडीतील सर्व शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
