तब्बल १२० हून अधिक घंटा चोरीस;नियोजन करुन चोरी केल्याचा संशय
⚡सावंतवाडी ता.१८-: निरवडे येथील सातपाटेकर मंदिरात असलेल्या घंटांपैकी १२० हून अधिक घंटा अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या आहेत. हा प्रकार बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला.
सकाळी दर्शनासाठी गेलेल्या भाविकाच्या हा प्रकार लक्षात आला. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. दरम्यान नियोजन करुन चोरी केल्याचा संशय आहे.
निरवडे येथील सातपाटेकर मंदिरात अनेक भाविक नवस बोलतात तो पूर्ण झाल्यानंतर त्याठिकाणी घंटा देण्याची प्रथा आहे. यातील घंटा अज्ञात चोरट्याने काल बुधवारी रात्री पळवून नेल्या आहेत. हा प्रकार लक्षात आल्यावर सावंतवाडी पोलिसांना फोन वरुन माहिती देण्यात आली. पोलिस त्याठिकाणी दाखल झाले असून त्यांनी संबधित चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे याबाबत काही दिवसापूर्वी मळगाव भूतनाथ मंदिरातील घंटा चोरीला गेल्या होत्या ही घटना ताजी असताना हा आता नवीन प्रकार उघड झाला आहे त्यामुळे याबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेऊन याचा तपास करावा अशी मागणी गावचे मानकरी तथा माजी सरपंच प्रमोद गावडे यांनी केली आहे.
