⚡मालवण ता.१८-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने क्रांतीदिनाचे औचित्य साधून मोफत स्कॉलरशिप वर्गाचे उदघाट्न करण्यात आले. या शिष्यवृत्ती वर्गासाठी ४३ विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड केली असून दर शनिवार रविवारी व सुट्टीच्या दिवशी हे वर्ग सुरु राहाणार आहेत. डिसेंबर पर्यंत सर्व अभ्यास क्रम पूर्ण करण्यात येणार असून दर महिन्याला सराव परीक्षा घेण्यात येणार आहेत.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ऍड. श्री. देवदत्त परुळेकर, प्रमुख अतिथी टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एस. खानोलकर, त्याचप्रमाणे राज्य पुरस्कार विजेते शिक्षक शिवराज सावंत, संस्थेचे कार्याध्यक्ष दिपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कार्यकारिणी सभासद नितीन वाळके, मुक्तागणच्या संचालिका सौ. मंगल परुळेकर, सौ. ज्योती तोरस्कर तसेच प्रशिक्षण देण्यासाठी निवड झालेल्या मनाली वेंगुर्लेकर या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला
वैष्णवी आचरेकर व सोनाली कोळंबकर यानी साने गुरुजी यांची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हटली. त्यानंतर नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या कार्याची माहिती करून दिली. दिपक भोगटे यांनी या उपक्रमासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती तसेच मुलांच्या अध्यापनासाठी केलेले वेळापत्रक व विषय याबाबत माहिती दिली.
यावेळी शिवराज सावंत, सौ. ज्योती तोरस्कर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. मनाली वेंगुर्लेकर यांनी आपल्या स्वानुभवातून स्कॉलरशिप परीक्षेसाठी वेळेचे नियोजन, नियमितपणे सराव आदी आवश्यक असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी आजच्या क्रांती दिनी एक चांगला उपक्रम सुरु केला असून विद्यार्थी व पालकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याचे आवाहन करत संस्थेकडून या उपक्रमासाठी जे काही सहकार्य लागेल ते दिले जाईल असे सांगितले. पालक प्रतिनिधी म्हणून शासकीय अधिकारी रमण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी स्कॉलरशिप वर्गासाठी निवड झालेले सर्व विद्यार्थी वं त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले तर आभार नितीन वाळके यांनी मानले. कार्यक्रमाची सर्व व्यवस्था संजय आचरेकर, मनोज गिरकर व सेवांगणच्या सर्व कर्मचारी वर्गाने केली होती.
