आ. नितेश राणे;सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधारावा व जिल्ह्यातील विद्यार्थी हे राज्यस्तरापर्यंत अव्वल ठरावेत यासाठी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सदैव प्रयत्न केले. शिक्षण हाच त्यांनी विकासाचा पाया मानला. त्यांना प्राप्त झालेल्या प्रत्येक पदाच्या माध्यमातून त्यांनी येथील मुलांना जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा कशा प्राप्त होतील यासाठी मेहनत घेतली. १९९० पूर्वी या जिल्ह्यातील शिक्षणाची असलेली अवस्था पाहता त्यांनी जिल्ह्यात विविध शैक्षणिक सोयी सुविधा निर्माण करून या जिल्ह्यातील मुलांना आपण दुर्गम भागात राहतोय असे वाटू नये यासाठी त्यांनी सदोदित प्रयत्न केले. त्यामुळेच आज जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधारला असून दहावी व बारावीतील कोकण विभागाचे यश हे त्याचेच प्रतीक आहे. त्यामुळे महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या देशात भविष्यातील जागतिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनीही आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करा त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी दिली.
युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून येथील मुलांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे यासाठी संदेश सावंत व सौ. संजना सावंत करीत असलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. तसेच येथील युवकांना योग्य संदेश देण्यासाठी प्रतिष्ठान कार्य करत असून राणेसाहेबांना अपेक्षित असलेले कार्य त्यांच्या हातून घडत आहे. यापुढेही त्यांनी केलेल्या सर्व कार्यक्रमांना आपल्याकडून सदैव सर्वतोपरी सहकार्य लाभेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात एस टी एस २०२२ चा बक्षीस वितरण समारंभ सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश महासत्ता बनण्यासाठी देशाची युवा पिढी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम झाल्यास देशाचे भवितव्य उज्वल ठरेल असा संदेश दिला आहे. आज आपण जगातील ज्या देशांशी महासत्ता म्हणून स्पर्धा करत आहोत त्या अमेरिका चीन युरोप यासारख्या देशांपेक्षा आपल्या देशाला उज्वल भवितव्य आहे. कोरोना महामारीच्या नंतर देशाचा आज सुवर्णकाळ आहे. त्यामुळेच येथील युवक शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी आपण आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आता राज्यात भाजपा व सेना युतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता कोणालाही काहीही कमी पडू नये त्यासाठी आमचे सदैव प्रयत्न राहणार आहेत. माझे सहकारी जिल्हा परिषद सदस्य माजी सभापती व अन्य भाजपचे पदाधिकारी हे देखील या जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी निस्वार्थीपणे काम करीत आहेत.
युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संदेश सावंत यांनी मुलांना बक्षीस रूपाने टॅब लॅपटॉप व अन्य पारितोषिके दिली आहेत.
सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च च्या माध्यमातून युवा प्रतिष्ठान करीत असलेल्या कार्याचे प्रसिद्ध केलेले पुस्तक हे युवा पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक आहे. भावी पिढी घडविण्याचे काम हे पुस्तक नक्कीच करेल. त्यामुळे आपल्या पाल्यांना बाहेरच्या जगात ज्या स्पर्धांना सामोरे जावे लागेल त्या दृष्टीने त्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण देऊन स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील मुलांच्या शैक्षणिक यशातील गुणगौरव कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून देत या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या विकास भाई सावंत यांचा आमदार नितेश राणे यांनी विशेष गौरव केला. कोणताही राजकीय अभिनवेश न बाळगता विकास भाई यांनी केलेले सहकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.विकास भाई सावंत व माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकारणात वेगवेगळे झेंडे असले तरीही विकासासाठी एकत्र येऊन एक वेगळा संदेश दिला आहे, अशा शब्दांत त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रम स्थळी देशाचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आमदार नितेश राणे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा बँक संचालक विकासभाई सावंत, युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा माजी जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, जि.प. चे माजी शिक्षण सभापती प्रमोद कामत, माजी जि.प. सभापती अंकुश जाधव, सौ. शर्वाणी गावकर, माजी जि.प. सदस्या श्वेता कोरगावकर, माजी जि.प. सदस्या उन्नती धुरी, पल्लवी राऊळ, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक राजू बेग, माजी न.प. सभापती ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, माजी सभापती प्रमोद सावंत, बांदा सरपंच अक्रम खान, दिलीप भालेकर, परीक्षा प्रमुख सिंधुरत्न टॅलेंट सर्च सुशांत मर्गज
शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म. ल. देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
