मळगाव रस्त्यावर बेवारस उभ्या असलेल्या ट्रकमधील बेकायदेशीर दारू जप्त…

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ३८ लाख ७६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

⚡बांदा ता.१६-: सातार्डा -सावंतवाडी रस्त्यावर मळगाव येथील हॉटेल कोकण क्राऊन नजिक बेवारस उभ्या असलेल्या ६ चाकी ट्रॅक मधील बेकायदेशीर दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने कारवाई करत तब्बल ३८ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल १५ रोजी सकाळी करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क खात्याचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी एच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक पी एस रासकर यांनी केली. या कारवाईत निरीक्षक एस पी मोहिते, अमित पाडाळकर, टी बी पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान संदीप कदम यांचा समावेश आहे.
. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पथकाला मळगाव येथे बेवारस ट्रक उभा असून त्यात गोवा बनावटीच्या दारूचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती मिळाली. पाथकाने जाऊन पाहणी केली असता ट्रकच्या (एमएच २४ एयु ०५७७) पाठीमागील हौद्याची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळला. पथकाने २३ लाख ७६ हजार रुपये किमतीचे गोवा बनवटीच्या रॉयल क्वीन माल्ट व्हिस्कीच्या ७५० मिली मापाच्या सिलबंद ७ हजार २०० बाटल्या भरलेले ६०० कागदी पुठ्ठ्याचे खोके जप्त केले. तसेच १५ लाख रुपये किमतीचा ट्रक देखील जप्त केला. घटनास्थळी ट्रक चालक किंवा अन्य कोणीही आढळून नं आल्याने संशयित आरोपीला फरार घोषित करण्यात आले. अधिक तपास दुय्यम निरीक्षक पी एस रासकर करत आहेत.

You cannot copy content of this page