⚡सावंतवाडी ता.१६-: मळगाव- तेलकाटावाडी येथील रहिवासी ज्येष्ठ दशावतारी कलाकार सखाराम गणेश लातये उर्फ बाबी लातये (लातये मामा) (७५) यांचे रविवारी निधन झाले.
बाबी लातये हे पंचायत समिती व नंतर सार्वजनिक बांधकाम विभागात कामाला होते. आपली नोकरी व घर सांभाळून त्यांनी मळगाव स्थानिक दशावतार मंडळातून दशावतार नाटकात काम केले. मळगाव दशावतार पेटाऱ्यातील गणपतीची त्यांनी दशावतार नाटकात काम करून सेवा केली. येथील सर्व मंदिरात होणाऱ्या दशावतारी नाटकात त्यांनी विविध प्रकारच्या उत्तम भुमिका साकारल्या. शालू मंगल कार्यालयात त्यांचा ज्येष्ठ दशावतारी कलाकार म्हणून सन्मानही करण्यात आला. तसेच त्यांना भजनाचीही प्रचंड आवड होती. तरुण असताना ते वेगवेगळ्या वाडीतील लोकांना गोळा करून गणेश चतुर्थी तसेच इतर वेळी विविध ठिकाणी जाऊन भजन करायचे, आणि भजनात भेटलेला विडा ते स्वतः ला न ठेवता भजनासाठी आलेल्या सर्वांना वाटत असत, त्यामुळे ते खूपच प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना व तेलकाटावाडीतील भजनप्रेमींना एकत्र करून स्वतः चा भजन मंडळ तयार केला. भजनातील त्यांची आवड पाहता त्यांनी तयार केलेला बाळ गोपाळ भजन मंडळ तेलकाटावाडी हा मंडळाच्या नावाने किंवा वाडीच्या नावाने प्रसिद्ध न होता तो त्यांच्या नावानेच म्हणजेच बाबी लातये भजन मंडळ याच नावानेच प्रसिद्ध झाला. त्यांचा स्वभाव हा एकदम मनमिळावू विशेषतः लहान मुलात ते एकदम लहान मुलाप्रमाणे मिसळून जात आसत. सर्वजण त्यांना आवडीने मामा म्हणून हाक मारत. त्यांच्या अचानक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्रीकृष्ण लातये व गजानन लातये यांचे ते वडील होत.
