बांदा /प्रतिनिधी
जुलै २०२१ मधील पूरग्रस्तांना अद्यापपर्यंत शासकीय नुकसान भरपाई न मिळाल्याने १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय शेर्ले येथील पुरबाधित ग्रामस्थ तथा वंचित बहुजन आघाडीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय शेर्लेकर यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, २१ जुलै २०२१ रोजी बांदा शहरात पूर येऊन नागरिक, व्यापारी यांचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाने नुकसानीचे पंचनामे केलेत, काही जणांना भरपाई देखील देण्यात आली. मात्र निधी नसल्याचे कारण देत अद्यापपर्यंत भरपाई देण्यात आलेली नाही. यासंदर्भात २६ जानेवारी रोजी उपोषण करण्यात आले होते, मात्र शासनाने आश्वासने देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने पूरग्रस्तानवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे. गणेश चतुर्थी सण तोंडावर आल्याने १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर करणार आहेत.
