कपडे वाळत घालताना शॉक लागल्याने वृद्धाचा मृत्यू…

वैभववाडी प्रतिनिधी
अंगणात बांधलेल्या तारेवर कपडे वाळत घालताना विजेचा शॉक लागून सांगुळवाडी बौध्दवाडी येथील उदाती यशवंत जाधव 65 यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.४५ वा. सुमारास सांगुळवाडी बौध्दवाडी येथे घडली.


उदाती जाधव हे सकाळी घरासमोरील अंगणात बांधलेल्या तारेवर कपडे वाळत घालत होते. यावेळी त्यांना या तारेतून विदयुत शाॕक बसून ते तारेला तसेच चिकटून होते. दरम्यान जळच असलेल्या कुञा जोराजोरात भूंकू लागला म्हणून त्यांच्या पत्नी घरातून बाहेर आल्या. त्यांनी पती उदाती हे तारेला चिकटलेले दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे लोक आले. त्यांनी सुकी लाकडी काठी लावल्यानंतर ते खाली पडले. त्यांना तातडीने वैभववाडी येथे खाजगी दवाखान्यात आणण्यात आले. माञ उपचारापूर्वीच ते मयत झालेचे डाॕक्टरांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. माहीती मिळताच वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगुळवाडी येथे जाऊन पंचनामा केला आहे.
मयत उदाती जाधव हे मुंबई महानगर पालिकेतून सेवानिवृत्त झाले होते. सांगुळवाडी बौध्द विकास मंडळाचे कोषाध्यक्ष म्हणून काम पहात होते. शेती, बागकाम व सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. सांगुळवाडी येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणीत त्यांचे भरीव योगदान आहे. सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे जाधव यांच्या आकस्मिक निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहीत मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ,भावजय, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.

You cannot copy content of this page