⚡कणकवली ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा माजी सभापती नागेश मोरये यांनी सोमवार १५ ऑगस्ट, २०२२ रोजी पुन्हा उपोषणाचा एल्गार जाहीर केला आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या उपोषणात सहभागी होऊन अन्यायाला वाचा फोडा, तसेच जोपर्यंत मुंबई-गोवा चौपदरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल भरू नका. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील वाहनांना टोल मधून मुक्ती (सुट) मिळावी. याकरिता गावागावातून सर्व बंधू-भगिनींनी नागेश मोरये यांच्या आमरण उपोषणात आपण साखळी पध्दतीने सहभागी व्हा, असे आवाहन नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन रेवडेकर यांनी केले आहे.
गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या चौपदरीकरणात ठेकेदार कंपनीने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून अवैध कामे केली. रस्त्याची लेवल योग्यप्रकारे केलेली नाही. दुतर्फा छोटी वाहने व ग्रामस्थांना जाण्यासाठी सर्व्हिस रोड नाही, नांदगाव येथे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा असलेल्या मोरी-नाले या ठिकाणी भिंती उभारून नैसर्गिक स्रोत बंद केले, त्याचा परिणाम स्थानिक घरांमधून पावसाचे पाणी भरू लागले. ओटव फाट्याजवळील ओव्हर ब्रीज पूर्व भागात संपादित जागा असताना सदर ब्रीज पश्चिम बाजूस सरकवल्यामुळे पुन्हा भू-संपादन करण्याची पाळी केसीसी कंपनी ठेकेदारावर आली आहे. त्याशिवाय सर्व्हिस रोडच उभारता येणार नाही. अनेक शेतकरी ग्रामस्थांना भू-संपादन केल्याचे पैसे दिले नाहीत. अनेक ठिकाणी महामार्ग लेव्हल वर-खाली आहे, त्यामुळे गेल्या दोन वर्षांत रस्ते अपघातात शेकडो ग्रामस्थांचे नाहक बळी गेले आहेत, पुलावर रात्रौ अंधार असतो. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा माजी सभापती नागेश मोरये यांनी सोमवार २५ जुलै, २०२२ रोजी या ठेकेदारांची चौकशी करुन गुन्हेगार अधिकारी व कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करण्यासाठी व ठोस मार्ग काढण्यासाठी कणकवली येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. परंतु या उपोषणाची दाहकता एक्सप्रेस वे बांधणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने संबंधित अधिकारी वर्गाने हे उपोषण आठवड्याभरासाठी स्थगित करा, असे लेखी पत्र नागेश मोरये यांना दिले. पण या पत्रात लिहिल्याप्रमाणे आठ दिवसात हे अधिकारी ठोस निर्णय घेत नसल्याने नागेश मोरये यांनी सोमवार १५ ऑगस्ट, २०२२ रोजी पुन्हा उपोषणाचा एल्गार जाहीर केला आहे.
