मानवी साखळीने गायले गेले राष्ट्रगीत

विद्यार्थी, नागरिक, सामाजिक – राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मालवण (प्रतिनिधी)

भारत माता की जय… वंदे मातरम… तिरंग्याचा जयजयकार असो… अशा देशभक्तीपर घोषणा देत आणि विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करत आज मालवण शहरात शालेय विद्यार्थी व नागरिकांनी राष्ट्रगीत म्हटले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालवण नगरपरिषदेतर्फे आयोजित या सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, नागरिक, सामाजिक संस्था, शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी यांनी सहभागी होत सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रगीत म्हणत शहरात देशभक्तीचा जागर केला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मालवण नगरपालिकेने आज सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मालवण शहरात मालवण नगरपालिका ते भरड नाका आणि भरड नाका ते बाजारपेठ मार्गे नगरवाचन मंदिर अशी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मानवी साखळी करण्यात आली. यात भंडारी हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, टोपीवाला हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज तसेच स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच ठिकठिकाणी सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, व नागरिक जमले होते. यावेळी अकरा वाजण्याच्या आधी नागरपालिकेकडून भोंगा वाजवून सूचना देण्यात आली व त्यानंतर ११ वाजता राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. यावेळी शहरात सर्वानी आपापल्या जागी उभे राहून राष्ट्रगीत म्हणत राष्ट्रीय एकतेच्या भावनेचे दर्शन घडविले.

या उपक्रमात नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे व अधिकारी वर्ग, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर गणेश कुशे, आपा लुडबे, बाळू तारी, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, अविनाश सामंत, शेखर गाड, पूजा सरकारे, अन्वेषा आचरेकर, मंगेश जावकर, मेघा सावंत, विद्या फर्नांडिस, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत व शिक्षक वर्ग, टोपीवाला हायस्कुलचे मुख्याध्यापक डी एस प्रभूखानोलकर व शिक्षक यांसह इतर सहभागी झाले होते. यावेळी शालेय मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page