मनसे सत्ताधाऱ्यांच्या पोकळ घोषणांचे बॅनर जिल्ह्यात झळकवून पोलखोल करणार : परशुराम उपरकर….

💫कणकवली दि.१९-: महाविकास आघाडीने जनतेवर अन्याय केला आहे. दिवाळी आधी शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई देण्याची घोषणा केली होती तर पालकमंत्र्यांनी नुकसान भरपाईपोटी साडेपाच कोटीचा निधी आल्याचेही जाहीर केले होते. तसेच आमदार वैभव नाईक यांनीही मत्स्य पॅकेजसाठी साडे बारा कोटी रुपये नुकसानभरपाई आल्याची जाहीर केले होते. पण तीही पोकळ घोषणा ठरली. मनसे सत्ताधाऱ्यांच्या या पोकळ घोषणांचे बॅनर जिल्ह्यात झळकवून सत्ताधाऱ्यांचा पोलखोल करणार आहे, असा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला.कणकवली येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी उपरकर म्हणाले, सत्ताधारी पालकमंत्री खासदार आमदार यांच्या घोषणा म्हणजे पुढचे पाठ आणि मागचे सपाट अशीच गत झाली आहे. यातील एकही घोषणा अस्तित्वात आली नाही. तसेच वाढीव विजबिलांबाबत विजमंत्र्यांनी जनतेला शॉक दिला आहे. या वाढीव वीजबिलांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचे सिंधुदुर्गात नक्कीच पडसाद उमटणार आहेत. या वाढीव विजबिलांविरोधात मनसे आवाज उठवणार असून विजबिलांविरोधात मनसेचा आवाज बुलंद करण्यासाठी जिल्हावासीयांनी साथ द्यावी, असे आवाहनही उपरकर यांनी जिल्हावासीयांना केले आहे. पोकळ घोषणा करून सत्ताधारी जनतेला फसवत आहेत. मनसे सत्ताधाऱ्यांच्या या पोकळ घोषणांचे बॅनर जिल्ह्यात झळकवून सत्ताधाऱ्यांचा पोलखोल करणार आहे. याबाबत जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या २० नोव्हेंबर रोजी सकाळी कणकवलीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही उपरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page