दहा हजार ध्वज करण्यात आले उपलब्ध

वैभववाडी पंचायत समितीचे नियोजन;अमृत महोत्सव निमित्त होणार भरगच्च कार्यक्रम

वैभववाडी संजय शेळके
‌ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वैभववाडी पंचायत समितीच्या वतीने दि. 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दहा हजार ध्वज पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या मार्फत उपलब्ध करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला मोफत ध्वजचे वाटप करण्यात येते आहे.

तसेच ग्रामपंचायत स्तरावर सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. या महोत्सवाची जनजागृती व प्रसिद्धी व्हावी यासाठी गावागावात चित्ररथ जाणार आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, तसेच अन्य स्पर्धा पार पडणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व तालुकास्तरावर ही विविध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे मंगळवार दि. 9 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सत्कार व मार्गदर्शन, सकाळी 11 वा. सामूहिक राष्ट्रगान, बुधवार दि. 10 ऑगस्ट रोजी स्वच्छता मोहीम, गावातील शासकीय कार्यालय स्वच्छता व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जाणार आहे. नागरिक ही आपापल्या घराचा परिसर यावेळी स्वच्छ करणार आहेत, गुरुवार दि. 11 ऑगस्ट रोजी महिला मेळावा व बचत गट मार्गदर्शन, तसेच गावच्या सामाजिक, सांस्कृतिक गाव पुस्तिका संकलन स्पर्धा, शुक्रवार दि. 12 ऑगस्ट रोजी मोबाईलचे दुष्परिणाम व साक्षरता याबाबत मार्गदर्शन, शनिवार दि. 13 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा हा उपक्रम जल्लोषात संपन्न होणार आहे, याच दिवशी गोपाळांची पंगत आयोजित करण्यात आली आहे, गावातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर मुलांना यावेळी पौष्टिक आहार व फळांचे वाटप केले जाणार आहे, तसेच गाव पुस्तिका माहिती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास तीन हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाला दोन हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. ही सर्व बक्षीसे रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहेत. तसेच सेंद्रिय शेती व शेतकरी मेळावे होणार आहेत. रविवार दि. 14 ऑगस्ट रोजी पर्यावरण संवर्धन शपथ, वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होणार आहे. सोमवार दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होईल. या दिवशी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 16 ऑगस्ट रोजी किशोरवयीन मुलींचे मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनपर देशभक्तीपर गीत कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. 17 ऑगस्ट रोजी प्रभात फेरीने समारोप कार्यक्रम व पारितोषिक वितरण होणार आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page