तहसीलदार रामदास झळके
वैभववाडी संजय शेळके
तालुक्यातील विदयार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे.विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेंचा अभ्यास करावा. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडूण त्याच चांगले करिअर करा. असे प्रतिपादन वैभववाडी तहसिलदार रामदास झळके यांनी केले.
वैभववाडी तालुका पञकार समितीच्यावतीने तालुक्यातील गुणवंत विदयार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात झळके बोलत होते. आनंदीबाई रावराणे महाविदयालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर,सचिव देवयाणी ओरोसकर, राज्य कार्यकारणी सदस्य गणेश जेठे, रवी गावडे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलिस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक प्रवीण देसाई, प्राचार्य डाॕ.सी.एस.काकडे, तालुकाध्यक्ष श्रीधर साळुंखे, जिल्हा सहसचिव महेश रावराणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रकाश काळे, आदी उपस्थिती होते.
यावेळी इयत्ता पाचवी, आठवी, दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विदयार्थ्यांना प्रशस्तीपञ, गुलाब पुष्प, भेटवस्तू मान्यवरांचे हस्ते प्रदान करुन गुणगौरव करण्यात आला.
विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हा पञकार संघाचे माजी अध्यक्ष तथा राज्य कार्यकारणी सदस्य गणेश जेठे म्हणाले, विदयार्थ्यांनी मोबाईलचा वापर करताना जपून करायला हवा. पैसा आणि प्रतिष्ठा दोन्हीही मिळवायची असेल तर चांगले शिक्षण घेतले पाहीजे. देशसेवा म्हणजे प्रत्यक्ष सिमेवर जाऊन लढले पाहीजे असे नाही. तर आपण समाजामध्ये वावरत असताना आपली कर्तव्य व जबाबदारी पार पाडायला हवी. तर जिल्हाध्यक्ष तोरस्कर म्हणाले, वैभववाडी सारख्या ग्रामीण भागात महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेने सुरु केलेले शैक्षणिक कार्य कौतुकास्पद आहे. विदयार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले करिअर घडवावे अशा शुभेच्छा दिल्या. गटविकास अधिकारी जयप्रकाश परब म्हणाले गुणवंत विदयार्थ्यांनी मिळविलेले यश हे निश्चित गौरवास्पद आहे. माञ यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी जिद्द व परिश्रमाला पर्याय नाही.तर पोलिस निरीक्षक अमित यादव म्हणाले, तुम्ही कोणतही क्षेत्र निवडा परंतु देशाचा एक चांगला नागरीक बना. यावेळी उपनिरीक्षक देसाई, सचिव देवयाणी ओरसकर, प्राचार्य डाॕ.काकडे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
