*सावंतवाडी प्रांताधिकारी, तहसीलदारांना देणार निवेदन : काँग्रेसचे बांदा विभागीय अध्यक्ष संदेश भोगले
*💫बांदा दि.२४-:* बांदा तलाठी बदनामीप्रकरणी तक्रादाराच्या तक्रारीनुसार संबंधित अधिकाऱ्याची चौकशी सुरू असताना बांदा शहरातील एका विशिष्ट लॉबी कडून त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणे ही मोठी गंभीर बाब आहे. चौकशीत सर्व सत्य बाहेर येईल, त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. तक्रारदारच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहू, यासाठी लवकरच सावंतवाडी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे बांदा विभागीय अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश भोगले यांनी प्रसिद्धपत्रकातून दिली आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, या प्रकरणातील तक्रारदार हे एका समाजाच्या ग्रुपचे सदस्य आहेत. आपल्या समाज बांधवांचा आपल्या आंदोलनाला पाठिंबा मिळेल या उद्देशाने त्यांनी संदेश प्रसारित केला होता. त्यामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ व राजकीय हेतू नव्हता. मात्र याची वाच्यता व प्रसार बाहेर करण्यात येत असल्याने ही निषेधार्ह बाब आहे. सदर अधिकाऱ्याने नैसर्गिक आपत्तीत केलेले पंचनामे हा त्यांच्या कर्तव्याचा व सेवेचाच भाग आहे. कोरोना काळात पोलीस, आरोग्य विभागाने देखील जीवावर उदार होऊन काम केले आहे, हे विसरून चालणार नाही. सदर अधिकाऱ्याची चौकशी ही निपक्षपणे व्हावी. कोणाच्याही दबावाला बळी पडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास विभागीय काँग्रेस तक्रारदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. याबाबत लवकरच महसूल मंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच प्रांताधिकारी व तहसीलदार यांची भेट घेत निपक्ष चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत असे श्री भोगले यांनी म्हटले आहे.
