भाजपचे यशवंत माधव : स्वातंत्रदिनी उपोषण करण्यावर ठाम
⚡बांदा ता.०१-: मडुरा रेल्वे स्टेशनवर सध्याच्या घडीला सर्व गणपती स्पेशल गाड्यांना थांबा मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. कोकण रेल्वेने केवळ पनवेल – मडगाव गाडीला मडूरेत थांबा दिला आहे. कोरे प्रशासन मडूरे दशक्रोशीतील नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करीत प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच हा एकूण प्रकार असे सांगत कोकण रेल्वेच्या निर्णयावर भाजपा सातार्डा शक्तिकेंद्र प्रमुख यशवंत माधव नाराजी व्यक्त केली.
मडूरे स्थानकावर यंदाच्या वर्षी एकाही गणपती स्पेशल गाडीला थांबा न दिल्याने थेट मुख्य व्यवस्थापकीय संचालकांना बेलापुर मुख्य कार्यालयात निवेदन दिले. सचिवांशी झालेल्या चर्चेत गाड्यांना थांबा मिळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. दुसर्याच दिवशी एका गाडीला मडूरेत थांबा दिल्याचे कोरे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, आम्ही यावर समाधानी नसल्याचे यशवंत माधव म्हणाले.
आमच्या भागातील चाकरमान्यांनी केवळ पनवेल – मडगाव गाडीचेच आरक्षण केले नसून सर्व गाड्यांचे आरक्षण केलेले आहे. महाराष्ट्र व गोवा सीमाभागातील प्रवाशांचाही फायदा होणार आहे. त्यामुळे कोरेचा हा निर्णय हास्यास्पद व अन्यायकारक असाच म्हणावा लागेल. महाराष्ट्रातील शेवटच्या स्टेशनवर गाड्यांना थांबा दिल्यास कोरेचे इतके काय नुकसान होणार असा सवाल श्री. माधव यांनी केला.
सर्व गाड्यांना थांबा न मिळाल्यास निवेदनात दिलेल्या इशार्यानुसार स्वातंत्रदिनी उपोषण करणे भाग पडणार आहे. कोरे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी समस्त चाकरमानी व स्थानिक ग्रामस्थांच्यावतीने यशवंत माधवयांनी केली आहे.
