जनतेची सेवा करण्याची सर्वाधिक संधी “महसूल”मध्ये

तहसीलदार अजय पाटणे यांचे प्रतिपादन

मालवण, दि प्रतिनिधी
शासकीय सेवा बजावत असताना जनतेची सेवा करण्याची मोठी संधी असलेला विभाग म्हणजे महसूल. जनतेच्या मोठ्या अपेक्षा या विभागाकडून असतात. त्या पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी या विभागात काम करणाऱ्या आपल्या सर्वांची आहे. यापुढेही प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्ण करून आपल्या कर्तव्यात अग्रेसर राहत मालवण तालुकाही अग्रेसर ठेवावा. असे प्रतिपादन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले.

मालवण येथील तहसील कार्यालय येथे तहसीलदार अजय पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार आंनद मालवणकर, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील उपस्थित होते.
तालुका स्तरावर सर्वोत्तम काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यात महसूल नायब तहसिलदार गंगाराम कोकरे, महसूल अव्वल कारकून आर. पी. मोंडकर, मसुरे मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण, महसूल सहाय्यक गणेश कुबल, कट्टा तलाठी नीलम नारकर, देवली कोतवाल हरी देऊलकर, पोलीस पाटील विठ्ठल बावकर यांना तहसील अजय पाटणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच तालुक्यातील महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान, एस. आर. चव्हाण, नीलम नारकर, हरी देउलकर यांना तालुकास्तरावरील सर्वोत्तम कामगिरीबत जिल्हा स्तरावरही सन्मानित करण्यात येत असल्याचे तहसीलदार पाटणे यांनी सांगितले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थितानी विचार मांडले.
महसूल विभागाअंतर्गत अनेक विभाग येतात. सर्वसामान्य जनतेसह सर्व स्तरातील जनतेची कामे या विभागांशी निगडित असतात. प्राधान्याने सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची मोठी संधी महसूल विभागात काम करताना आपल्याला मिळते हे आपले भाग्यच आहे. सोबत शासन स्तरावरील अनेक योजना राबविणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणे. आपत्ती काळात सेवा बजावणे. निवडणूक काळात जबाबदारी पूर्वक काम करणे. सर्वच महसूल विभागांतर्गत येते. तालुक्याचा गेल्या काही वर्षांचा विचार करता कमी कर्मचारी संख्या असतानाही प्रत्येकजण अधिकची जबाबदारी घेऊन चांगले काम करत आहे. कोरोना काळात, तोक्ते वादळातही सर्वानी चांगले काम केले असे कौतुकोद्गार तहसीलदार पाटणे यांनी व्यक्त केले.
तालुक्यात दरवर्षी महसूल उत्पन्न हे वाढतेच राहिले आहे. या महसुली वर्षातही जमीन महसूल १ कोटी ५९ हजार तर गौण खनिज दंड स्वरूपात सुमारे २४ वाहनांवर कारवाईतून ६० लाख ७८ हजार वसुल करण्यात आले. असा एकूण १ कोटी ६१ लाख ३७ हजार महसूल गोळा झाला आहे. अशी माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली.

You cannot copy content of this page