सानेगुरुजी कथामालेचा उपक्रम
मालवण (प्रतिनिधी)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा विशेष कार्यक्रम जि. प. प्राथमिक उर्दू शाळा, आचरे येथे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे सुरेश ठाकूर यांनी कथा कशा कथन कराव्यात याविषयीचे मार्गदर्शन मुलांना केले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील मुलांनी ‘किराते कुराण’ पठण केले. त्यानंतर “खरा तो एकची धर्म” ही साने गुरुजींची प्रार्थना मुलांनी सुस्वरात गायली. यावेळी साने गुरुजी कथामालेच्या फलकाचे उद्घाटन कथामाला कार्यकर्त्या श्रीम. आस्मा अशफाक मुजावर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मुलांनी उर्दूतून कथाकथन आणि समूह गान सादर केले. त्यानंतर सुरेश ठाकूर यांनी कथाकथन करत मार्गदर्शन केले. तसेच मनोरंजनात्मक विविध खेळ घेतले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक निसार युनुस सोलकर आणि सय्यद मुश्ताक सय्यद मुसा या शिक्षकांनी केले. या कार्यक्रमाला श्रीम. अजहरून्निसा सोलकर, जुलेखा अजीम आगा, तबस्सूम साजिद मुजावर, नाझिया सलीम खान, तन्जिल शकील शेख आणि पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
