सोन्याचा हार, नथ, चांदीची पैंजण, पैठणी, मोबाईल अशा बक्षिसांची खैरात
⚡मालवण ता.२९-: मालवणी संस्कृती व वारसा मंडळ या संस्थेतर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त दि. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी भव्य दिव्य अशी नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, यातील विजेत्या महिलांना पैठणी सोबत सोन्या, चांदीची बक्षिसे तसेच विशेष प्राविण्य म्हणून सोन्याचा हार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मालवण मेढा येथील आर्यन होम स्टे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर, गणेश पाडगावकर, सौ.विद्या फर्नांडिस, देवानंद लुडबे, ममता तळगावकर, कल्पना मेथर, गीता नेवाळे, योगेश्वर कुर्ले सल्लागार ऍड. अमृता अरविंद मोंडकर, शुभदा पाडगावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अरविंद मोंडकर म्हणाले,
सन २०१६ पासून मंडळातर्फे महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात येत असून कोरोना कालावधी मध्ये मात्र मंडळाच्या वतीने सतत दोन वर्षे या सणाचं वैशिष्ट्य जपत स्पर्धेऐवजी मास्क वाटप करण्यात आले होते. यावर्षी पुन्हा मालवण बंदर जेटी येथे नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण व जिल्ह्यातील महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पाहूणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत विशेष प्राविण्य म्हणून आकर्षक असा ९ ग्रॅम सोन्याचा हार (नेकलेस) बक्षीस म्हणून देण्यात येणार असून त्यासाठी अतिशर्ती ठेवण्यात आल्या आहेत. तर प्रथम क्रमांकांस पैठणी, सोन्याची नथ, द्वितीय क्रमांकास पैठणी व चांदीची पैंजण, तृतीय क्रमांकासाठी पैठणी व चांदीची पैंजण, चतुर्थ क्रमांकासाठी पैठणी तसेच सहभागी स्पर्धक व नागरिकांना कुपन देऊन त्यांच्यासाठी लकी ड्रॉ द्वारे चांदीचा कंबरपट्टा बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विजेत्यास १० लाख।रुपयाची विमा पॉलिसी काढून देण्यात येणार आहे.
स्पर्धकांना नारळ मोफत देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी नावनोंदणी स्पर्धेच्याच दिवशी दुपारी ३ ते ४ या वेळेत होईल. तत्पुर्वी नाव नोंदवण्याकरीता अरविंद मोंडकर ९८९२०५५८२०, गणेश पाडगावकर – ९४२३२१४७४५, विद्या फर्नांडिस- ७७६७०५३३६४, स्नेहल मेथर – ९७०२६०४७२० यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी अरविंद मोंडकर यांनी यावेळी केले.
