केंद्र संचालक असल्याच्या नावाखालीफसवणूक प्रकरणी खेड पोलिसांकडून दोघेजण ताब्यात

⚡कणकवली ता.२९-:
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आयुष्यमान भारत व नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरात आक्षेप घेत मुद्दे उपस्थित केले. व या संदर्भात पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आता वाढत असल्याचे समोर येऊ लागले आहे. यात प्रामुख्याने काल कणकवलीत घटना घडल्यानंतर या प्रकरणातील संशयित असलेल्या दोघांवर खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याची बाब समोर आली आहे.

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व भाजपा पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश केला व त्यानंतर शुक्रवारी सकाळी खेड पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले या प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल असल्याची बाब समोर आली आहे. खेड पोलिसांनी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत संशयीताला ताब्यात घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तर या संस्थेच्या नावावर हे सर्व सुरू होते त्या संस्थेच्या सचिवाला देखील खेड पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणात एकच खळबळ उडाली आहे. कणकवली नगराध्यक्षांनी या संदर्भात पर्दाफाश केल्यानंतर आता हळूहळू या प्रकरणातील अनेक चेहरे समोर येऊ लागले आहेत. कणकवली पोलीस स्थानकात या संदर्भात रीतसर प्रक्रिया सुरू आहे.
कणकवली शहरातील भाजपा पदाधिकारी आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी बेरोजगारांच्या होणाऱ्या फसवणुकीचा पर्दाफाश केला होता . दोघाना कणकवली पोलिसांच्या स्वाधीन केले. २५,००० हजार रुपये पगाराची नोकरी देतो असे आमिष दाखवून नोकरी पूर्वी दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी ५००० हजार रुपये भरून घेऊन खोटे प्रशिक्षण देऊन पोबारा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्यांची नगराध्यक्ष समीर नलावडे यांना माहिती मिळताच नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वतः त्या प्रशिक्षण हॉलमध्ये जाऊन त्या भामट्यांवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला आणि ते त- त, प- प करताच त्याना कणकवली पोलिसांच्या स्वाधीन केले.
आयुष्यमान भारत योजना अंतर्गत केंद्रसंचालक असल्याचे सांगत दोघांमार्फत कणकवली नगरपंचायत वाचनालय हॉलमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी उपस्थित राहत या कथित केंद्रसंचालकावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. तुमच्या निवृत्ती ची ऑर्डर दाखवा तुम्हाला नियुक्ती कोणी दिली ? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७५ तरुण व तरुणींकडून प्रत्येकी ५००० हजार रुपये प्रमाणे जी रक्कम गोळा केली ती घेण्यासंदर्भात शासनाची ऑर्डर दाखवा ? असे एक ना अनेक प्रश्न या कथित केंद्र संचालक आणि एका व्यक्तीला विचारत नगराध्यक्ष समीर नलावडे आणि भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार केला.
_तसेच याप्रकरणी कणकवली तालुका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील नगर वाचनालयात बोलवून घेण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी विनोद सावंत, निखिल जाधव, श्री ठाणेकर या ठिकाणी दाखल झाले. अशा प्रकारे आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. नंतर या संदर्भात थेट जिल्हा शल्यचिकित्सक यांना यासंदर्भात नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विचारणा केली त्यावर शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी कोणतीही नियुक्त आम्ही दिली नाही असे स्पष्ट केले.

अखेरपर्यंत केंद्र संचालक म्हणून नियुक्तीची ऑर्डर कथित केंद्र संचालक नगर वाचनालयाच्या सभागृहातील या प्रकारादरम्यान दाखवू शकले नाही. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातही तब्बल १६७ जणांची या कथित व्यक्तींकडून फसवणूक झाल्याचा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला. घेतलेले पैसे तात्काळ मागे द्या अशी मागणी समीर नलावडे यांनी केली आणि ती कथित संचालकाने मान्यही केली. याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पोलिसांना घडलेल्या सविस्तर माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक बरगे यांच्यासह सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, किरण मेथे, मंगेश बावधाने आदींनी कणकवली नगर वाचनालय धाव घेतली. यावेळी त्या कथित केंद्र संचालकांना त्यांच्या कागदपत्रांसह कणकवली पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस ठाण्यात पोलिसांकडून त्यांनी किती जणांची फसवणूक केली, प्रशिक्षण घेणारे अधिकृत आहेत काय? याबाबत चौकशी पोलिस ठाण्यात सुरू आहे.

You cannot copy content of this page