दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाचा पुढाकार
⚡सावंतवाडी ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक दिव्यांग विद्यार्थी आहेत की जे त्यांना व्याधी असूनही नियमित शाळेत जातात, यातील सर्वच पालकांची आर्थिक परिस्थिती असते असे नाही. याही परिस्थितीवर मात करत हे विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत ते शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून दुर्ग मावळा प्रतिष्ठान, कोकण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील निवडक २३ गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
दिनांक २५ जुलै २०२२ रोजी समग्र शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक राजू पाटील व रुपाली देसाई यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, श्री. शेर्लेकर यांच्या हस्ते दप्तर व शैक्षणिक साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागचे अध्यक्ष गणेश नाईक व सरचिटणीस सुनिल करडे उपस्थित होते.
या दप्तरांसाठी अजित नेरूरकर, डॉ. राहुल गवाणकर, डॉ. चेतन परब, अमोल सूर्यगान, स्वप्निल होडावडेकर, उमेश नेरूरकर, विनायक चव्हाण यांनी सौजन्य केले. तर कंपास, पेन्सिल, शार्पनर, खोडरबर, पट्टी या शालेय साहित्यासाठी शिरशिंगे येथील ज्ञानेश्वर राऊळ यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सौजन्य केले. वह्यांसाठी गार्गी गणेश नाईक व सुनिल धोंड यांनी सौजन्य केले.
दरम्यान ज्या ज्या दात्यांनी साहित्यासाठी सौजन्य केले. त्या सर्वांचे दुर्ग मावळा परिवाराकडून कोकण विभागचे अध्यक्ष गणेश नाईक यांनी आभार मानले.