⚡मालवण ता.२१-: मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे हे प्रशासकीय दृष्ट्या महत्वाच्या पदावर कार्यरत असतानाही मालवण मुख्यालय ठिकाणी न राहता वारंवार ओरोस येथे राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एकूणच त्यांच्याकडे असलेला महत्वाचा पदभार व पावसाळी आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता त्यांनी मालवण मुख्यालय ठिकाणीच राहावे. अन्यथा याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तसेच नगरविकास विभाग यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली जाणार आहे. अशी माहिती भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे.
मालवण नगरपरिषदेवर सध्यस्थितीत प्रशासकीय राजवट आहे. सोबतच पावसाळी व आपत्ती काळ सुरु आहे. मालवण शहर हे प्रामुख्याने समुद्र किनारपट्टीवर वसलेले असल्याने आपत्तीच्या पडझडीच्या घटना घडण्याची शक्यता असते. या सर्व पार्श्वभूमीवर मालवण शहराचे प्रमुख या नात्याने मुख्याधिकारी यांनी मुख्यालय याचं ठिकाणी राहणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, मुख्याधिकारी मुख्यालय ठिकाणी राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी विचारात घेता मुख्याधिकारी जर मुख्यालय ठीकाणी राहत नसतील तर त्यांच्यावर योग्यती कारवाई व्हावी. याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी व्हावी. अशी भूमिका निलेश राणे यांनी स्पष्ट केली आहे.
