करारपत्र करूनही टॉवर उभारण्यात होतेय दिरंगाई.
*💫मालवण दि.२२-:* मालवण तालुक्यातील काळसे आणि धामापूर हे दोन गाव गेली कित्येक वर्षे मोबाईल रेंज पासून वंचित आहेत. त्यामुळे अनेक शासकीय, खाजगी कामात या गावातील रहिवाशांना नेहमी अडचणींना सामोरे जावे लागत आहे म्हणूनच बी एस एन एल टॉवर मंजूर असून तसेच जागामालकांशी करारपत्र केलेले असतानाही टॉवर उभारण्यास दिरंगाई होत असल्यामुळे काळसे धामापूर ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षापूर्वी काळसे गावात बी एस एन एल टॉवर मंजूर झाला आहे. सदर टॉवर मंजूर झाल्यानंतर उप अभियंता बी एस एन एल ऑफिस मालवण यांनी काळसे येथील जमिनमालक संतोष महादेव सावंत यांच्यासोबत दिनांक १५/१०/२०१८ रोजी रितसर करारनामा केलेला आहे. तरीसुद्धा जवळपास दोन वर्षे होऊन गेली तरी टॉवर उभारणीसाठी कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे टॉवर मंजूर असूनही मोबाईल रेंजपासुन काळसे धामापूरची जनता वंचित राहिलेली आहे. या परिसरात इतर खाजगी मोबाईल कंपन्यांचेही मोबाईल नेटवर्क नसल्याने काळसे धामापूर रहिवाशांना बी एस एन एल कंपनीच्या मोबाईल नेटवर्क वरच अवलंबुन रहावे लागत आहे परंतु बी एस एन एल कडून मात्र ग्रामस्थांच्या मागणीची टॉवर मंजूर असूनही दखल घेतली गेली नाही. म्हणूनच बी एस एन एल टॉवर मंजूर असून तसेच जागामालकांशी करारपत्र केलेले असतानाही टॉवर उभारण्यास दिरंगाई होत असल्यामुळे काळसे धामापूर ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे ग्रामस्थांच्या सह्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, पोलीस अधिक्षक, महाप्रबंधक बी एस एन एल ऑफिस सावंतवाडी, उपअभियंता बी एस एन एल ऑफिस मालवण यांना दिले असून पालकमंत्री उदय सामंत यांना इमेल द्वारे सदर निवेदन पाठविण्यात आले आहे.
