हर घर तिरंगा” चे कणकवलीत यशस्वी नियोजन करा:अरुण चव्हाण

कणकवली पं. स. मध्ये सरपंच, ग्रामसेवकांना गटविकास अधिकाऱ्यांच्या सूचना

⚡कणकवली ता.१९-:
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शासनाकडून “हर घर तिरंगा झेंडा” हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात कणकवली तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना सक्रिय सहभागी होण्याकरिता ग्रामपंचायतीने आतापासूनच जागरूकता हाती घ्यावी. या उपक्रमाकरिता लागणारे तिरंगे झेंडे हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहेत. याकरिता गावातील घर निहाय संख्या लवकरात लवकर तालुकास्तरावर द्या व शासन स्तरावरुन दिलेल्या सूचनांप्रमाणे नेटके नियोजन करा. अशा सूचना कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी दिल्या.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा झेंडा उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांची पंचायत समितीच्या सभागृहात संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण बोलत होते. यावेळी पी डी पालकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, राजेंद्र शिंदे, कृषी अधिकारी सुभाष पवार, सुनील पांगम, रवी मेस्त्री, विनोद सावंत आदी उपस्थित होते.
9 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरा समोर त्याचबरोबर शासकीय, अशासकीय, आस्थापना व सहकारी, शैक्षणिक संस्था यांनी आपल्या इमारती, घरांवर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करायची आहे. प्रत्येक जिल्ह्यात याचे नियोजन करण्याकरिता जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वारंवार आढावा घेतला जाईल. मात्र या संदर्भातील शासन निर्णयामध्ये ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे काटेकोर पालन सरपंच ग्रामसेवक यांनी करा अशा सूचना श्री चव्हाण यांनी दिल्या. 20 ते 30 जुलै या कालावधीमध्ये आवश्यकता असणाऱ्या तिरंगा झेंड्यांची संख्या निर्धारित करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरून गावातील प्रत्येक घर व अन्य आस्थापना यांची संख्या तालुकास्तरावर कळवा अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. तसेच ग्रामनिधीतून या उपक्रमाकरिता खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या उपक्रमामध्ये स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींना देखील सहभागी करून घ्या अशा सूचना देण्यात आल्या. 25 ते 29 जुलै या कालावधीत व 8 ऑगस्ट रोजी अशा दोन टप्प्यात ग्रामसभा घेण्याच्या देखील सूचना या उपक्रमाच्या निमित्ताने देण्यात आल्या. जेणेकरून ग्रामसभेच्या माध्यमातून या उपक्रमाची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच यानिमित्ताने वृक्षारोपण करण्याकरिता रोपे ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून द्या. व 8 ऑगस्ट रोजी च्या ग्रामसभेत या रोपांचे वाटप करा. जेणेकरून या ग्रामसभेला जास्तीची उपस्थिती राहील व ग्रामसभा ही पूर्ण होतील अशा सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विभागाच्या स्तरावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरची अंमलबजावणी आपण नेटक्या पद्धतीने करा. ग्राम पातळीवर स्वातंत्र्य सैनिक, सेवानिवृत्त लष्करी जवान, यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व देशासाठी योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींचा सत्कार ग्रामपंचायत स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच याचबरोबर अन्य अनेक सूचना व कृती आराखड्यातील नियोजन यशस्वी करा असे आवाहन देखील गटविकास अधिकारी श्री चव्हाण यांनी केले. तिरंग्याचा आकार किती असावा? तिरंगा फडकवताना व उतरवताना कोणती काळजी घ्यावी? ध्वजा संहिता कशाप्रकारे पाळावी यासंदर्भात देखील ग्रामसभांमध्ये मार्गदर्शन व जनजागृती करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच यावेळी सरपंच व ग्रामसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावर देखील चर्चा करण्यात आली.

You cannot copy content of this page