जय गणेश इंग्लिश स्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
⚡मालवण ता.१५-:
दहावी परीक्षेनंतर करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे करियरचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यादृष्टीने वाटचाल करावी. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून त्यांचा करियरचा कल लक्षात घेऊन पुढील मार्गवर चालण्यास सक्षम बनवावे व मुलांच्या सोबत राहावे. करियरचे ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन व मेहनत करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन मालवण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील मालवण एज्युकेश सोसायटी संचलित जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शुक्रवारी सकाळी संपन्न झाला. यावेळी दहावीच्या परीक्षेत प्रशालेतून प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या अनुक्रमे अनुश्री संजय वराडकर, आराध्य मंदार भिसे, निनाद प्रसाद आरोंदेकर या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू, पुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका सौ. तेजल वेंगुर्लेकर, इंचार्ज निशिकांत पराडकर, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक संजय वराडकर, मंदार भिसे, सौ. भिसे, प्रसाद आरोंदेकर, सौ. प्रज्ञा आरोंदेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी निशिकांत पराडकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी विनायक कोळंबकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनावर भर देऊन स्वतःची बौद्धिक प्रगती केली पाहिजे. दहावीनंतर शाळेतून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे शिक्षण घ्यावे, असेही कोळंबकर म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुश्मिता घाटवळ यांनी केले. तर आभार पंकज राणे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते.
