शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर यांची माहिती
बांदा/प्रतिनिधी
महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बांदा शहरात गेले काही दिवस विजेचा लपंडाव सुरु आहे. आज दिवसभर वीज पुरवठा खंडित असल्याने याचा नाहक त्रास ग्राहकांना होत आहे. कंपनीचे अधिकारी समर्पक उत्तरे देत नसल्याने उद्या शुक्रवारी महावितरणच्या बांदा विभागीय कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने धडक देणार असल्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी दिला आहे.
श्री काणेकर म्हणाले कि, महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने येथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यापूर्वीची सफाईची तसेच लाईन दुरुस्तीची कामे न केल्याने पावसाळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. याबाबत ग्राहकांनी विचारणा केली असता योग्य उत्तरे मिळत नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधीना देखील समर्पक उत्तरे मिळत नसल्याने विजेच्या तक्रारीची संख्या ही वाढतीच आहे. यासाठी उद्या शुक्रवारी सकाळी महावितरण कार्यालयात धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असल्याचे काणेकर यांनी स्पष्ट केले.
