⚡सिंधुदुर्ग दि.१४-: सत्तासंघर्ष आणि सुडाचे राजकारण यांनी विकल, विफल झालेल्या
ज़िल्हावासियांना अन्याय आणि दहशतीविरोधात लढण्याची प्रेरणा देत या सुडाच्या राजकारणाविरोधात रणशिंग फुंकणारे ज़िल्ह्यातील पहिले ज़िगरबाज नेतृत्व म्हणजे संदेश पारकर. नव्वदीच्या दशकापासून सुरु झालेल्या या राजकीय लढ्याबरोबरच ज़िल्हावासियांच्या प्रश्नांसाठी झगडणाऱ्या या संघर्षवीराचा आज वाढदिवस. यनिमित्ताने ग्लोबल महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या संघर्षमय कारकिर्दीवर प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न…
गर्भगळीत झालेल्या जनमानसाला बेभान आणि निधड्या नेतृत्वाची आस लागलेली असते.
नव्वदचे दशकही काहीसे याच स्थितीतून जात होते. याच दशकात सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय दहशतीच्या राजकारणाने जन्म घेतला. कै. श्रीधर नाईक याच सुडाच्या राजकारणाला बळी पडले. श्रीधर नाईकांची हत्या ही अन्यायाविरोधातील संघर्षाची ठिणगी ठरली. या ठिणगीचे वणव्यात रुपांतर करणारा तरुण म्हणजेच संदेश पारकर. श्रीधर नाईकांच्या तालमीत राजकरणाची व समाजकारणाची शिकवण घेतलेला संदेश भाई त्यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील राजकीय दहशतवादाविरोधात निधड्या छातीने जीवावर उदार होऊन लढत राहिला. संदेश पारकर ही तत्कालीन सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज होती. नव्वदच्या दशकात ज्यांना कणकवलीत राहुन राजकारण करायचे होते, त्यांच्यासाठी संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य घटक होता. श्रीधर नाईक व त्यापाठोपाठ सत्यविजय भिसे यांच्या राजकीय हत्येनंतर कणकवलीच्या भुमीमध्ये राजकीय दहशतवादाविरोधात जे पीक फुलारुन आले, त्याचा संदेश पारकर हा धगधगता धुमारा होता.
आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याशी त्यांचे भावनिक नाते जोडलेले आहे. कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्याएवढी किंबहूना त्याहुन चांगली वागणुक देणारा नेता म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील कोणताही कार्यकर्ता एकदा त्यांच्या संपर्कात आला की तो कायमस्वरूपी त्यांचाच बनुन जातो. आजपर्यंतच्या संघर्षमय जीवनात खांद्याला खांदा भिडवून साथ देणारे कार्यकर्ते हीच त्यांची खरी ताकद ठरली आहे.
१९९३ साली संदेश पारकरांनी कणकवली ग्रामपंचायतीची निवडणुक जिंकली व पहिल्याच टर्ममध्ये सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ‘कणकवली सरपंच’ म्हणुन विराजमान झालेल्या संदेश भाईंनी पुढील १० वर्षे हे पद यशस्वीरीत्या हाताळले. दरम्यानच्या काळात त्यांनी पंचायत समितीची निवडणुक लढवली आणि पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येताच त्यांची पहिल्याच टर्ममध्ये थेट विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
१९९९ साली राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले नारायण राणे पुर्ण भरात असताना, वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी संदेश पारकरांनी त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणुक लढवली. त्यामुळेच ‘संदेश पारकर’ हे नाव राज्यस्तरावर पोहोचले. २००३ साली कणकवली नगरपंचायतीची स्थापना झाली आणि संदेश भाई कणकवलीचे पहिले ‘नगराध्यक्ष’ बनले. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकरणाचा केंद्रबिंदु असलेले कणकवली शहर तब्बल १५ वर्षे (१९९३ ते २००८) संदेश पारकरांच्या अधिपत्याखाली राहिले. ‘संदेश कणकवलीचा आणि कणकवली संदेशची’ हे समीकरण संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध झाले.
क्षेत्र कोणतेही असो, तुमचा प्रभाव वाढू लागला की तुमचे शत्रु आपोआप तयार होतात. एकीकडे संदेश भाईंची लोकप्रियता वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत विरोधकांची संख्यासुद्धा तितक्याच प्रमाणात वाढत असल्याने त्यांचे पंख छाटण्याचे प्रकार सुरु झाले. अखेर पक्षांतर्गत कुरघोड्याना कंटाळून त्यांनी दिनांक २७ जानेवारी २०१३ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राजकीय कुरघोडीमुळे पक्ष बदलावा लागला असला तरी त्यांच्या सामाजिक कार्यात तसूभरही फरक पडला नव्हता. राजकारण हे समाजकारणाचे माध्यम असावे पण राजकारण म्हणजेच सर्वस्व असू नये. त्यांनी खेळाडूंना नेहमीच पाठींबा दिला. क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, माराथोन स्पर्धा अशा अनेक खेळांना त्यांनी चालना दिली. जिल्ह्यात चांगले खेळाडू निर्माण व्हायला हवेत म्हणुन प्रोत्साहन दिले. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा संदेश देऊन वाढदिवसादिवशी ५०० बाटल्या रक्त गोळा करण्याचा संकल्प आखला. संदेश पारकरांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने फेब्रुवारी २०१४ साली त्यांना कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष बनवुन ‘लाल दिवा’ बहाल केला.
युद्धात आणि राजकारणात चुकांना क्षमा नसते. तुमची एक चुक तुम्हाला राजकारणातून उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेशी ठरते. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच ‘कणकवलीचा अनभिषिक्त सम्राट’ असलेल्या संदेश पारकरांनी कणकवली नगरपंचायतीची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात दिली. पुढील काळात याच नगरपंचायतीतील निर्णयप्रक्रियेपासून त्यांना दुर ठेवुन विरोधी गटाचा नगराध्यक्ष बसवण्याची कारस्थाने शिजू लागली. आता संदेश पारकरांकडून आणखी एका बंडाची तयारी सुरू झाली आणि निमित्त होते कणकवली नगरपंचायतीतील नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीचे…! पुन्हा एकदा संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष संदेश पारकर विरुद्ध नारायण राणे यांच्यातील लढतीकडे लागले. राणे पितापुत्रांनी सगळी राजकीय ताकद पणाला लावली पण कणकवलीत पुन्हा एकदा संदेश पारकरांनीच गुलाल उधळला. राणेसमर्थक उमेदवारांना चारीमुंड्या चीत करून पारकर गटाचे नगरसेवक नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. शेवटी अपेक्षेप्रमाणे शिस्तभंगाचा ठपका ठेवुन काँग्रेस पक्षाने संदेश पारकरांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
२०१८ सालची कणकवली नगरपंचायतीची निवडणुक भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची केली. थेट नगराध्यक्ष निवड असल्यामुळे नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपने आपल्या भात्यातील ब्रम्हास्त्राचा प्रयोग करण्याचे निश्चित केले. अगदी शेवटच्या क्षणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढवण्याचे आदेश दिले. पक्षाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळे संदेश भाई स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले. नारायण राणेंना कणकवलीच्या होम ग्राऊंडमध्ये धुळ चारण्यासाठी भाजप व शिवसेनेमध्ये युती झाली. मात्र जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटेना. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची मने दुखावली आणि युती फक्त कागदावरच राहिली. संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या या निवडणुकीत शेवटच्या क्षणी दगाफटका झाल्यामुळे केवळ ३७ मतांनी संदेश पारकरांचा पराभव झाला. त्या निसटत्या पराभवाने खचून न जाता संदेश भाईनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कणकवली, वैभववाडी आणि देवगड हे तीनही तालुके अक्षरशः पिंजून काढले. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांनाच तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित झालेले असताना त्यांच्या नशीबाने पुन्हा एकदा उचल खाल्ली. विधानसभा निवडणुक अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेस आमदार नितेश राणेंनी रहस्यमयरीत्या भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनाच भाजपकडून विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली. भाजपने नितेश राणेंना विधानसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेनेकडून सतीश सावंत यांना एबी फॉर्म देत अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. संपुर्ण महाराष्ट्रात शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये युती असली तरी कणकवली विधानसभा मतदारसंघात या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात शड्डु ठोकल्याने संपुर्ण महाराष्ट्रात ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती. दुसरीकडे आपल्या राजकीय ताकदीची भाजपला जाणीव करून देण्यासाठी संदेश भाईनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मात्र नितेश राणेंविरोधी मतांचे विभाजन होईल या भितीने शिवसेना नेत्यांनी त्यांची वेळीच समजुत घातली. शेवटी जनतेच्या इच्छेखातर आपल्या विधानसभा निवडणुक लढवण्याचा आकांक्षेला मुरड घालुन संदेश पारकर शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांच्या बाजुने निवडणुकीच्या रणांगणात उतरले. संदेश भाईच्या एन्ट्रीने शिवसेनेचे पारडे जड झाले. कणकवलीतील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संदेश पारकरांनी हातात शिवबंधन बांधुन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतरही गेली अडीच वर्षे संदेश पारकरांनी आपला संघर्ष तशाच पद्धतीने सुरु ठेवला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वास जाताच ओसरगाव येथे टोल वसुली करण्याचा घाट प्रशासनामार्फत घातला जात होता. कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीनही तालुक्यातुन हजारो लोक जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सिंधुदुर्गनगरीत रोजचा प्रवास करतात. त्यांना टोल भरणे परवडणारे नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफ करण्यात यावा म्हणुन सर्वात पहिल्यांदा आंदोलन करून अन्यायाविरोधात आवाज बुलंद करणारे संदेश भाईच होते. त्यांची ही कार्यतत्परता पाहून माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांची निवड कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी केली. रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचा पक्षनेतृत्वाने केलेला हा यथोचित सन्मान होता. अगदी अलीकडेच कणकवली शहरात रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतरित्या उभारण्यात आला आणि त्यानंतर सरकारी पुतळा रात्रीच्या काळोखात जमीनदोस्त करण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या विचारांचे पाईक असलेल्या संदेश भाईना ही गोष्ट खटकली. त्यांनी पत्रकार परिषदेत आगपाखड करून कणकवली नगरपंचायतीतील सत्ताधारी व प्रशासन यांची मिलीभगत सर्वांसमोर आणली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना पदावरून पायउतार व्हावे लागले. आता शिवसेना विरोधी पक्षात आहे आणि विरोधात शिवसेना अधिक झळाळून निघते असा शिवसैनिकांचा इतिहास आहे. फक्त या संघर्षाच्या काळात शिवसेनेने रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी कधीही तयार असणाऱ्या संदेश पारकरांसारख्या कार्यकर्त्याला पक्षीय पाठबळ पुरवणे आवश्यक आहे.
कुणी चांगले म्हणावे म्हणून किंवा कोणत्याही अभिलाषेने काम करू नये. आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असेल तर असे काम करतच राहावे, हाच संदेश
गेली ३० वर्षे राजकीय संघर्षात अक्षरशः चंदनासारखे झिजलेल्या संदेशजीनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ज़िल्हावासियांना दिला आहे. आज त्यांच्या वाढदिवशी ‘ग्लोबल महाराष्ट्र’ परिवारातर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा. परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो, याच सदभावना!!!
