Headlines

ओझर विद्यामंदिरमध्ये सापांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.१०-: ‘कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम, सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेमध्ये सापांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम, सिंधुदुर्ग’ या संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनिल गावडे सदस्य स्वप्निल परुळेकर आणि स्वप्निल गोसावी यांनी विद्यार्थ्यांना सापांविषयी सखोल मार्गदर्शन केले.

प्रारंभी ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी ‘कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमच्या सदस्यांचे स्वागत केले. यावेळी अनिल गावडे व त्यांचे सहकारी स्वप्निल परुळेकर, स्वप्निल गोसावी यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून सिंधुदुर्गमध्ये आढळणाऱ्या विषारी व बिनविषारी सापांविषयी फोटोसहीत सविस्तर माहिती दिली. सिंधुदुर्गमध्ये आढळणाऱ्या सापांमध्ये नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार या सापांव्यतिरिक्त इतर साप हे बिनविषारी किंवा निम विषारी असतात, साप हे मानवाचे मित्रच असतात त्यामुळे त्यांची हत्या करू नये, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रश्नोत्तराद्वारे सापांविषयी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील शंका आणि भीती त्यांनी दूर केली. एखाद्या व्यक्तीला साप चावल्यास काय करावे, याचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण करत माहिती दिली. साप चावल्यानंतर मांत्रिकाकडे किंवा कोणत्याही भोंदू व्यक्तीकडे न जाता सरळ त्या व्यक्तीला दवाखान्यात दाखल करावे असे त्यांनी सांगितले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सापांविषयी असलेल्या चुकीच्या समजुती आणि अंधश्रद्धा दूर होण्यास मदत झाली.

याप्रसंगी ‘कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम, सिंधुदुर्ग’ यांच्यावतीने प्रशालेला वटवृक्षाचे रोप भेट म्हणून देण्यात आले. ओझर विद्यामंदिर मध्ये व्याख्यान आयोजित केल्याबद्दल गुजर विद्यामंदिर चे सहाय्यक शिक्षक पि. के. राणे यांनी ‘कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम, सिंधुदुर्ग’ या संस्थेचे आभार मानले.

You cannot copy content of this page