काँग्रेसचे जिल्हा सचिव बाळू अंधारी यांची टीका
*💫मालवण दि.२०-:* राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे हे निष्क्रिय जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या गेल्या एक वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत लागली आहे. काँग्रेसच्या कोणत्याही मंत्र्याला ते जिल्ह्यात आणू शकले नाही, ना जिल्ह्याच्या विकासा बाबत कोणते नियोजन करू शकले. त्यांच्या या निष्क्रिय कार्यपद्धतीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेसची नामोनिशानी दिसली नसल्याची घणाघाती टीका राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सचिव महेश उर्फ बाळू अंधारी यांनी पत्रकार परिषदेत करून जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची पक्षश्रेष्टींकडे आपण तक्रार केली असून त्यांना हटवून सक्षम जिल्हाध्यक्ष नेमण्याची मागणी केली असल्याची माहितीही अंधारी यांनी दिली. काँग्रेसचे जिल्हा सचिव महेश अंधारी यांनी मोरेश्वर कॉम्प्लेक्स मालवण येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, अरविंद मोंडकर, पल्लवी तारी, सरदार ताजर, आदी व इतर उपस्थित होते. यावेळी महेश अंधारी म्हणाले, बाळा गावडे यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आपलाच सिंहाचा वाटा होता. मात्र त्यांच्या मुळे जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसची झालेली वाताहत कशी भरून काढावी याचा विचार आपण आता करत आहोत. गेल्या एक वर्षात ते कोणत्याही एका विकास कामाच्या उद्घाटनाचा नारळ फोडू शकले नाहीत. गावडे यांनी केवळ सावंतवाडी, देवगड, कणकवली या तीनच तालुक्यांची कार्यकारिणी निवड केली. तर इतर तालुक्यात केवळ तालुकाध्यक्ष नेमले आहेत. गावडे यांनी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची कोणतीही मीटिंग घेतली नाही, असेही अंधारी म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीत इन्सुली सोडून बाळा गावडे कुठेही फिरले नाही. राज्यात महाआघाडीचे सरकार असताना ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा विचार करणे गरजेचे होते. मात्र निवडणूक लढविण्याबाबत शिवसेना राष्ट्रवादी या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्याशी गावडे यांनी कोणतीही चर्चा केली नाही. काँग्रेसचे संपर्क मंत्री सतेज पाटील यांच्याशी गावडे यांनी कधी संपर्कच केला नाही, असेही अंधारी म्हणाले. आपण जिल्हा सचिव पदावर असून पक्षशिस्त पाळून आपल्या पद्धतीने काम करत आहोत. कोरोना काळात काँग्रेसतर्फे आपण गरजू लोकांना मदत केली, वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय सुरू होण्याबाबत मंत्री व शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. आम्ही सामान्य कार्यकर्ते असल्याने आमचा पाठपुरावा व काम उजेडात आले नाही. आमदार शिवसेनेचे असल्याने श्रेय त्यांना गेले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हे वरिष्ठांच्या दबावा खाली काम करत आहेत, अशी टीकाही अंधारी यांनी केली. गावडे यांची आपण पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केली असून गावडे यांच्या जागी सक्षम जिल्हाध्यक्ष नेमण्याची मागणी केली आहे असेही अंधारी यांनी सांगितले.
