शासनमालकीच्या जागेत स्मारक व्हावे हीच शिवसेनेची भूमिका केली स्पष्ट
कणकवली ता.०८-: कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराचा वाद निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर सिंधुदुर्गात दाखल झालेले गौरीशंकर खोत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास येथील छ. शिवाजी महाराज चौकात पूर्वीपासून असलेल्या शिवाजी महाराज पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कोकण पर्यटन समिती उपाध्यक्ष संदेश पारकरही उपस्थित होते.
शिवसैनिकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशी जोरदार घोषणाबाजी केली.
विशेष म्हणजे याच पुतळ्यापासून नजीकच शिवाजी महाराजांचा नविन पुतळा कुणीतरी बसविल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून याबाबत कणकवली शहरात चर्चा सुरु आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्वीपासूनचा पुतळा अद्यापही सर्व्हिसरोडच्या मध्यभागीच असून त्याच्या स्थलांतरणाचा प्रश्न सुटलेला नाही. अशा स्थितीत शिवसेनेतर्फे पूर्वीच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यात आल्याने आता पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना गौरीशंकर खोत म्हणाले, मराठी आणि हिंदू माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच मुक्ती मिळते. काही गद्दार लोकांमुळे आमच्यावर मोठे काम येऊन पडले आहे. फंदफितूरी करणाऱ्यांना संपवायचे असेल तर शिवाजी महाराजांचा इतिहास आठवलाच पाहीजे. जे गंडांतर महाराष्ट्रात घडले त्याविरोधात लढण्याची ताकद मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेतले.
आम.वैभव नाईक म्हणाले, या शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरणाबाबत प्रशासन योग्य भूमिका घेईल व त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल. याबाबत माजी पालकमंत्री उदय सामंत आणि संदेश पारकर यांनी बैठका घेऊन पाठपुरावा केला. पुतळ्यासाठी चांगली जागा मिळविण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरु आहे.
कणकवलीत ‘ रात्रीस खेळ चाले”
शिवसेना युवा नेते संदेश पारकर म्हणाले, कणकवली शहर गेल्या दोन वर्षांपासून रात्रीचे काम करण्यामध्ये प्रसिद्ध झाले आहे. पण,हा प्रकार जनतेला मान्य नाही. शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक कणकवलीत उभे रहावे, ही शिवसेनेची इच्छा आहे. येथील १८ गुंठे शासनमालकीच्या जागेत स्मारक व्हावे, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी एक कोटीची तरतूद तत्कालिन पालकमंत्र्यांनी केली होती.असे पारकर म्हणाले.
याप्रसंगी महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत पालव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख शैलश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, ठेकेदार रामदास विखाळे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, रिमेश चव्हाण, सचिन आचरेकर, वैदेही गुडेकर, संजय पारकर, दामू सावंत, सुनील पारकर आदी उपस्थित होते.
