‘कोरे’विरोधात सावंतवाडी तहसिलदार कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी छेडणार बेमुदत उपोषण-:सुरेश गावडे…

मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला दिले निवेदन

*💫बांदा दि.२०-:* तीन दशकापूर्वी कोकण रेल्वे महामंडळाने प्रकल्पासाठी रोणापाल व मडुरा गावातील जमीन संपादित केली होती. सर्वसाधारणपणे महामंडळामध्ये कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळणार या भावनेने शेतकऱ्यांनी कवडीमोल दरात जमिनी दिल्या. परंतु वारंवार मागणी करूनही आम्हाला न्याय मिळालेला नसल्याचे सांगत कोकण रेल्वेकडून आमच्यावर अन्याय झाला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळण्यासाठी प्रजासत्ताकदिनी सावंतवाडी तहसिलदार कार्यालयासमोर आम्ही बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशारा शेतकरी तथा रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात श्री.गावडे म्हणाले की काही कालावधीनंतर महामंडळाने अनेक नियम बदलून आम्हा जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना नोकरीपासून वंचित ठेवलेले आहे. एका सामाईक सातबारात पाच कुटुंबधारकांची नावे असून पैकी एकालाच नोकरी मिळेल या अटींमुळे कुटुंबावर अन्याय झाला आहे. ज्या क्षेत्रातून रेल्वे मार्ग गेलेला आहे अशा एकाच मालकाच्या क्षेत्राचे रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे तुकडे झालेले आहेत. परंतु मागणी करूनही जाण्या-येण्यासाठी कोणतीही सोय केलेली नाही. यावर विचारणा केली असता सातबारामध्ये पायवाट किंवा रस्ता नोंद नाही असे ‘कोरे’कडून सांगण्यात येते. एका सातबारामधील एका इसमाला सदर महामंडळाने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन नोकरी दिली आणि काही वर्षानंतर इतर भागदारांची तक्रार झाली तर त्यांना ‘रिमुव्ह फ्रॉम ड्युटी’ असा शेरा मारून कामावरून घरी बसविण्यात आल्याचे प्रकार घडल्याचे श्री.गावडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केलेल्या आहेत अशांवर अन्याय झाला आहे. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आपल्या सहकाऱ्यांसमवेत प्रजासत्ताकदिनी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा सुरेश गावडे यांनी प्रशासनास दिला आहे. कायदा व सुव्यवस्था आणि आरोग्य याबाबतची कुठलीही घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहणार असल्याचेही नोटीसमध्ये म्हटले आहे.

You cannot copy content of this page