⚡मालवण ता.२९-: वीज पुरवठा सुरळीत चालू रहावा यासाठी आपले कर्तव्य बजावत असताना शॉक लागून निधन झालेल्या आचरा येथील आनंद मिराशी या कंत्राटी कर्मचाऱ्याला अखेर कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून नूतन जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाई नरे आणि संदीप साटम यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळवून देत संबंधित ठेकेदाराकडून भरघोस अशी मदत त्याच्या कुटुंबियांना मिळवून दिली आहे.
आनंद मिराशी याच्या घरी जाऊन त्याचे वडील कृष्णा मिराशी, नातेवाईक संतोष मिराशी, शर्मिला मिराशी यांच्याकडे लाखो रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी भाई नरे, जि. प. चे माजी बांधकाम सभापती जेरोन फर्नांडिस, आचरा सोसायटी उपाध्यक्ष संतोष मिराशी, विजय कदम, यल्लापा, गुरव, राम लोके आदी उपस्थित होते. यावेळी अशाच प्रकारे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. त्यांनी केलेल्या या कामाबद्दल आचरा वासियांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.
