आचरा देऊळवाडी येथील विवाहितेची आत्महत्या

⚡मालवण ता.२७-:
आचरा देऊळवाडी येथील सौ. राखी प्रसाद घाडी (वय ३३) या विवाहित महिलेने राहत्या घराच्या मागील पडवीत नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत आचरा पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबत राखी घाडी हिचे पती प्रसाद घाडी यांनी आचरा पोलिस स्थानकात खबर दिली आहे. प्रसाद घाडी यांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार प्रसाद हे सकाळी कामावर गेल्यानंतर त्यांची पत्नी राखी एकटीच मुलासमवेत घरी होती. प्रसाद हे कामावर असताना वाडीतील शेजाऱ्यांनी घाडी यांच्या घराचा दरवाजा बंद असून मुलगा बाहेर रडत असल्याचे कळविले. प्रसाद हे कामावरून घरी आले असता घराला आतून कडी लावलेली होती. पडवीत मागच्या बाजूने छपरावर चढून आत प्रवेश केला असता त्यांची पत्नी राखी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याचे प्रसाद घाडी यांनी खबरीत म्हटले आहे.

या घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करत पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल एस.एस. कांबळे करत आहेत. राखी यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू असा परिवार आहे.

You cannot copy content of this page