कार्यालयात सतरंजी घालून केला कारभार
ओरोस ता.२३-:
सामाजिक न्याय विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून कार्यालयातच सतरंजी बैठक आंदोलन सुरू केले आहे. खुर्चीवर न बसता जमिनीवर सतरंजी घालून त्यावर बैठक मांडून दिवसभर कारभार केला. या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक न्याय विभागातील राजपत्रित अधिकारी संघटनेने दिला आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेने आपल्या विविध मागण्या लेखी स्वरूपात शासनाकडे केल्या होत्या. मात्र, त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने पूर्व सूचना देत आजपासून राजपत्रित अधिकाऱ्यांनी पहिला टप्पा म्हणून कार्यालयात खुर्चीवर न बसता सतरंजीवर बसून कारभार करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचे स्वरूप बदलण्यात येईल. त्याला शासन जबाबदार राहील. यापूर्वी एवढ्या टोकाचे आंदोलन कधीही संघटनेने केलेले नाही. मात्र मागण्या मान्य होत नसल्याने ही भूमिका घ्यावी लागल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
