मराठा समाजाला योजनांचा लाभ देण्यास प्रशासन करतेय टाळाटाळ

मराठा समाजाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सिंधुदुर्गनगरी ता ३० मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाचा धसका घेत शासनाने मराठा समाजाला लाभ देणारे काही निर्णय घेतले आहेत. मात्र प्रशासनाकडून मराठा समाजासाठी असलेल्या योजना आणि लाभ समाज बांधवांपर्यंत पोचविण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे तरुण आणि विद्यार्थ्यांना अनेक लाभापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत व शैलेश घोगळे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले. तसेच याबाबत लवकरच लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेवून मराठा समाजाला त्यांचे लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या मुलांना आर्थिक मागास म्हणून (ई डब्लू एस )लाभ देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील २२०० मुलांना या लाभापासून वंचित राहावे लागले. राजश्री शाहू छत्रपती शिषवृत्ती योजना व पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे या योजना किती अभ्यासकांना लागू होत आहेत आणि किती अभ्यासकांना लाभ दिला याची माहीती देण्यात यावी.

सारथी योजनेतील एनएनएमएस शिष्यवृत्ती लाभापासून मराठा मुले वंचित आहेत. याला जबाबदार कोण ?असा प्रश्न करत ज्या अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली नाही अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करून विद्यार्थ्यांना देण्यात यावी. खुल्या प्रवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणाऱ्या ७ मे २०२१ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी. याकडे आज अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी याना निवेदन सादर करत लक्ष वेधण्यात आले.

You cannot copy content of this page