किनारपट्टीवर पोलीस व तहसील प्रशासनाने संयुक्त गस्त घालत वॉच ठेवावा : पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडून तारकर्ली किनारपट्टीची पाहणी
मालवण ता.२७-:* समुद्र किनारपट्टीवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असून समुद्र स्नानासाठीही मोठ्या संख्येने पर्यटक समुद्रात उतरत आहेत. या पर्यटकांची सुरक्षा महत्वाची आहे. पोलीस व महसूल प्रशासनने किनारपट्टी भागात गस्त घालून तसेच अन्य उपाययोजना राबवत पर्यटकांवर लक्ष ठेवावे. स्पीकर च्या माध्यमातून सूचना देत पर्यटकांनी खोल समुद्रात न जाण्याबाबत आवाहन करण्यात यावे. अश्या सूचना पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी मालवण पोलीस व तहसील प्रशासनास दिल्या आहेत. चार दिवसांपूर्वी तारकर्ली किनारपट्टीवर बोट बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहे. खबरदारी उपाययोजना केल्या जात आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.
मालवण किनारपट्टी भागत मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून किनारपट्टी भागात मोठी गर्दी आहे. या पार्श्वभूमीवर तारकर्ली किनारपट्टी येथे शुक्रवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पाहणी केली. यावेळी डीवायएसपी विनोद कांबळे, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे आदी उपस्थित होते.
मालवणात येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा महत्वाची आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वाधिक महत्व दिले पाहिजे. त्या दृष्टीने उपाययोजना करा. कोणत्याही पर्यटकाला नाहक त्रास होणार नाही. याचीही काळजी प्रशासनाने घ्यावी. किनारपट्टी भागात गस्त सुरू ठेवा. समुद्रात उतरणाऱ्या पर्यटकांनी खोल समुद्रात जाऊ नये याबाबत सतत सूचना द्या. पावसाळा सुरू होईपर्यंत पर्यटकांचा ओघ कायम असणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी. नगरपालिका, ग्रामपंचायत व स्थानिकांची मदत घ्यावी. अश्या सूचना पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी दिल्या आहेत.
