तारकर्ली बोट दुर्घटनेप्रकरणी सात जणांची जामिनावर सुटका

मालवण ता.२६-:* तारकर्ली समुद्रात स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस व इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकात बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०, रा. देवबाग) यांच्यासह सात जणांवर काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर या सातही जणांना पोलीसांनी अटक केली. या सात जणांना काल मालवण न्यायालयात हजर केले असता सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

तारकर्ली समुद्रात मंगळवारी स्कुबा डायविंग साठी गेलेली गजानन स्कुबा डायविंग सेंटरची बोट किनाऱ्यावर परतत असतात लाटांच्या तडाख्याने पलटी होऊन दुर्घटना घडली होती. यात बोटीतील सुमारे २८ जण समुद्राच्या पाण्यात फेकले जाऊन अकोला येथील आकाश भास्करराव देशमुख व पुणे येथील डॉ. स्वप्नील मारुती पिसे या दोन पर्यटकांचा नाकातोंडात पाणी गेल्याने गुदमरून मृत्यू झाला होता. तर अन्य पर्यटक जखमी झाले होते. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. या प्रकरणाची जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी बोटीतील पर्यटक लैलेश प्रदीप परब (वय ३६, रा. अणाव कुडाळ) यांनी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार असुरक्षितरित्या पर्यटकांना समुद्रात घेऊन जाऊन समुद्राच्या लाटांकडे दुर्लक्ष करून बोट चालवून बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी व इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०, रा. देवबाग), सुयोग मिलिंद तांडेल (वय २३, रा. देवबाग), विकी फिलिप फर्नांडिस (वय ३२, रा. देवबाग), प्रथमेश रामकृष्ण बसंधकर (३१, रा. दांडी मालवण), तुषार भिकाजी तळवडकर (वय ३९, रा. तारकर्ली), विल्यम फ्रान्सिस लुद्रीक (वय ५४, रा. देवबाग) यांच्यावर भा.द.वि. कलम ३०४ (अ), ३३६, ३३७, २८०, २८२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना मालवण पोलिसांनी अटक करून काल दुपारी मालवण न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी संशयीत आरोपींना पोलीस कस्टडी देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली. मात्र पोलीस कस्टडी साठी पोलोसांनी दिलेली कारणे योग्य नसल्याचे संशयित आरोपींच्या वकिलांनी पटवून दिल्याने न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळत सातही जणांना प्रत्येकी ७ हजार ५०० रुपयांचा जामीन मंजूर केला. संशयित आरोपींच्या वतीने ऍड. उल्हास कुलकर्णी, ऍड. अमेय कुलकर्णी, ऍड. प्राची कुलकर्णी यांनी काम पाहिले.

या प्रकरणी मालवण पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. नरळे हे करत आहेत. बंदर विभागाकडून दंडात्मक कारवाई तारकर्ली येथील समुद्रात स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत दोघा पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणी मालवण बंदर विभागाने बोट मालक प्रफुल्ल मांजरेकर यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. सदर बोटीचे सर्व्हे सर्टिफिकेट नसल्याने तसेच विमा नसल्याने या दोन्ही कारणासाठी प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला आहे अशी माहिती बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी दिली. या दुर्घटनेबाबत प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक यांनीही तारकर्ली किनारी भेट देऊन आढावा घेतला.

You cannot copy content of this page