जिल्ह्यातील ६९७ गावे कोरोना मुक्त

जिल्हा साथरोग अधिकारी डॉ संदेश कांबळे यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी ता २४ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ७४१ महसूल गावांपैकी सद्यस्थितीत ६९७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर अद्यापही जिल्ह्यात सहा रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा अद्यापही कोरोनामुक्त झालेला नाही. जिल्ह्यातील एकूण ७४१ गावांपैकी ३८ गावामध्ये एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही. कोरोनाची लागण झालेल्या ७०३ गावांपैकी सद्यस्थितीत ६९७ गावे कोरोनामुक्त झालेली आहेत. मात्र अद्यापही कणकवली तालुक्यात १, देवगड २, कुडाळ-१, वेंगुर्ला १, सावंतवाडी १ असे सहा रुग्ण सक्रीय आहेत. तर जिल्ह्यातील ६९७ महसूल गावे सद्यस्थितीत कोरोनामुक्त झालेली आहेत. यामध्ये वैभववाडी तालुका ५५, कणकवली ९८, देवगड ९३, मालवण १२५, कुडाळ ११६, वेंगुर्ला ७२, सावंतवाडी ८४ तर दोडामार्ग तालुक्यातील ५४ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ७४१ महसूल गावांपैकी ६९७ गावे कोरोनामुक्त झाली असली तरी अद्यापही जिल्ह्यात सहा रुग्ण सक्रीय आहेत. जिल्हा पूर्ण कोरोनामुक्त झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ संदेश कांबळे यांनी व्यक्त केले.

१२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांचे ६० टक्के लसीकरण पूर्ण – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ ते १४ वयोगटातील २५ हजार १९३ ( विद्यार्थी ) लाभार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून आतापर्यंत १८ हजार ४५४ लाभार्थ्यांना पहिला तर १३ हजार ८७५ लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण करण्यात आले आहेत. आतापर्यंत ६० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले असून प्राथमिक शाळा सुरू होतात शंभर टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर संदेश कांबळे यांनी दिली.

You cannot copy content of this page