तोक्ते वादळाच्या नुकसानीसाठी केंद्राची किती मदत मिळाली

वादळावेळी नारायण राणेंचे कार्यकर्ते कुठे होते ? ;आ वैभव नाईक यांचा केंद्रीयमंत्री राणेंना सवाल

मालवण दि प्रतिनिधी तोक्ते वादळ झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानभरपाई पोटी राज्य शासनाने ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यात मालवण शहरासह किनारपट्टी भागात झालेल्या नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळाली. तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीचे ज्यांनी ज्यांनी पंचनामे केले त्या सर्वांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली. मात्र तोक्ते वादळानंतर नारायण राणे यांनी केंद्र शासनाचा एक रुपया तरी आणला काय? हे जनतेसमोर जाहीर करावे. त्याचबरोबर वादळाच्या काळात राणे व त्यांचे कार्यकर्ते कुठे होते? असा रोकडा सवाल आमदार वैभव नाईक यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून उपस्थित केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल देवबाग येथे आम वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर आज आम नाईक यांनी मालवण कुंभारमाठ येथील जानकी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत घणाघाती टीका केली यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, मंदार केणी, बाबा आंगणे, बाबा सावंत, बंडू चव्हाण प्रसाद मोरजकर, बाळ महाभोज विनायक परब यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार नाईक यांनी पत्रकार परिषदेत नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले ते म्हणाले, गुजरातला ज्यावेळी वादळ झाले त्यावेळी गुजरातला केंद्र शासनाचे पॅकेज देण्यात आले.

परंतु नारायण राणे हे केंद्रात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करत असताना त्यांच्या जिल्ह्यात तोक्ते वादळ झाले तेव्हा ते एकही रुपया आणू शकले नाहीत. राणे फक्त शिवसेनेवर आरोप करण्यासाठी केंद्रात मंत्री आहेत आणि हे जिल्ह्यातील जनतेला गेल्या वर्षभरात कळून चुकले आहे. केंद्रातून ते एक रूपयाचा निधी आणि एकही रोजगार आणू शकलेले नाहीत. शिवसैनिक पहिल्यापासून आहे त्याचप्रमाणे 80 टक्के समाजकारणाचे काम करत आहेत. ज्यावेळी तौक्ते वादळ झाले त्यावेळी सुरवातीचे दहा दिवस शिवसेनेचे तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, पदाधिकारी हे रस्त्यावर उतरून काम करत होते.

शहरातील वीजपुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी प्रयत्न करत होते. याउलट या काळात नारायण राणे व त्यांचे कार्यकर्ते कुठे होते? त्यामुळे तोक्ते वादळग्रस्तांना मदत करण्याच्या विषयासंदर्भात कोणताही आरोप करण्याचा नैतिक अधिकार राणेंना नाही. तोक्ते वादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यास केंद्राची समिती ही उशिरा आली होती. त्यावेळी राणेंची ताकद काय आहे हे दिसून आले. त्यामुळे या समितीकडून जिल्ह्याला काही मदत मिळेल का? हे त्यांनी पहावे आणि नंतरच आरोप करावेत. मालवणच्या किनारपट्टीवरील बंधार्‍याची कामे वर्षभरापूर्वीच मंजुर झाली होती. मात्र अन्य परवानग्या राहिल्या होत्या. त्या पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्षात तळाशील व देवबाग येथील कामांना सुरवात झाली आहे.

आम्ही भूमिपूजन केलेली कामे सुरू आहेत. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्यापूर्वी राणेंनी केंद्राकडून किती निधी आला. दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले याचा विचार करावा. अनेक खासदार आपल्या विभागात रस्त्यांच्या विकासासाठी केंद्राचा फंड घेवून जातात. राणेंनी वर्षभरात केंद्रातून किती फंड आणला याचा विचार करावा. बंधार्‍यांच्या कामासाठी आम्ही सुरवातीस बजेटमध्ये तरतूद केली. त्यानंतर बंधारे मंजूर झाले. प्रत्यक्षात काम सुरू व्हायला हवे अशी आमची भूमिका होती. त्यानुसार आम्ही भूमिपूजन केलेल्या तळाशील, देवबाग येथील कामे प्रत्यक्षात सुरू आहेत.

याउलट न सुरू झालेल्या कामाचे भूमिपूजन राणेंनी केले. राणेंनीही बंधार्‍याचे काम करावे त्याला आमचा विरोध नाही. मात्र आम्ही सीआरझेडची परवानगी घेवून सुरू केलेली राज्यातील ही पहिली कामे आहेत. जिओ ट्यूबचे काम निकृष्ट झाल्याने त्या ठेकेदाराचे उर्वरित दीड कोटी रुपयांचे बिल दिलेले नाहीत. येत्या काळात जिओ ट्यूबच्याऐवजी दगडी बंधार्‍याची कामे केली जाणार आहेत. जिल्ह्यात शासनाच्या माध्यमातून तोक्ते वादळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आला. मालवण पालिकेने कोव्हिड सेंटर पहिले सुरू केले. या सेंटरमुळे अनेकांचे प्राण वाचले. शासकीय रुग्णालयात किती जणांचे प्राण वाचले आणि खाजगी रुग्णालयात किती खर्च झाला याची राणेंनी माहिती करून घ्यावी असेही श्री. नाईक म्हणाले. देवबाग गावातील भाऊ गोवेकर, मोबार, ख्रिश्‍चनवाडी, भांजीवाडी, श्रीकृष्ण मंदिर येथील बंधार्‍यांच्या कामासाठी, दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून यापूर्वी सुमारे ८५ लाख रुपये खर्च करण्यात आला असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी दिली.

You cannot copy content of this page