विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा केला सन्मान
वेंगुर्ला ता.२३-:* ‘मैत्री ८९‘ या पाटकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवार वेंगुर्ला येथे एकत्र येत विविध कार्यक्रमांनी उत्साहात स्नेहसंमेलन साजरे केले. यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणा-या डॉक्टर, परिचारिका, समाजसेविका आणि पत्रकार यांचा ‘मैत्री ८९‘ च्यावतीने सन्मान करण्यात आला.
वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमधील १९८९ सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी ‘मैत्री ८९‘ या शिर्षकाखाली माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप बनविला आहे. या ग्रुपतर्फे स्नेहसंमेलनाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमही राबविले जातात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षे स्नेहसंमेलन आयोजित करता आले नव्हते. यावर्षी मात्र, सर्वांनी एकत्र येत उत्साहात स्नेहसंमेलन साजरे केले. येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात पार पडलेल्या या स्नेहसंमेलनावेळी बहुसंख्य माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान, कराओकेसह घेतलेल्या फनीगेम्समध्ये उपस्थितांनी सहभाग घेत आनंद द्विगुणीत केला. फनीगेम्समधील विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
या स्नेहसंमेलनात विविध क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यात कोविड काळात रुग्णसेवा करणा-या वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.अश्विनी सामंत-माईणकर, रुग्णालयाच्या परिचारिका विनिता तांडेल, साहस प्रतिष्ठानच्या माध्यमातून अपंगांसाठी कार्य करणा-या रुपाली पाटील आणि कै.श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्कार प्राप्त प्रथमेश गुरव यांचा समावेश होता. या सर्वांना ‘मैत्री ८९‘च्यावतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सायंकाळी या स्नेहसंमेलनाचा समारोप झाला.
