माणूस म्हणून जगण्याची दृष्टी राष्ट्रसेवादल शिबिरात मिळते : राजाभाऊ शिरगुप्पे

अद्वैत फाउंडेशन आयोजित राष्ट्रसेवादल व्यक्तीमत्व विकास शिबिराचा समारोप

कणकवली ता.२२-:* अद्वैत फाउंडेशन आयोजित राष्ट्रसेवादल व्यक्तिमत्व शिबिराच्या माध्यमातून जाती- धर्म भेद ना बाळगता आपण सर्व एक आहोत हा मानवतावाद जपणारी पिढी उदयास येईल. साने गुरुजींचे समतेचे विचार आजच्या युवा आणि बाल पिढीवर रुजविण्याचे काम राष्ट्रसेवादल शिबिरातून होत असते. भारतीय संविधानावर आधारित समानतेची शिकवण राष्ट्रसेवादल व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या माध्यमातून अद्वैत फाउंडेशन देत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील जेष्ठ विद्रोही साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांनी केले.

कणकवली येथील अद्वैत फाउंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजित राष्ट्रसेवादल व्यक्तीमत्व विकास शिबीराच्या समारोपप्रसंगी शिरगुप्पे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर, राष्ट्रसेवादल चे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ, गोपुरी आश्रम चे अध्यक्ष प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकर, वात्सल्य मंदिर ओणी चे डॉ.महेंद्र मोहन, अद्वैत फाउंडेशन च्या अध्यक्ष सरिता पवार, सचिव राजन चव्हाण, अजिंक्य गायकवाड, श्रीकांत चव्हाण , शिबिरार्थीचे पालक आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले की आज समाजात जातीं जातींत आणि धर्मामध्ये विष पेरण्याचे काम सुरू आहे.

भांडवलशाही व्यवस्था बळकट होत आहे आणि कष्टकरी समाज पिचत चालला आहे. दुर्दैवाने सोशल मीडियातून उद्बोधक माहिती ऐवजी विध्वंसक माहितीचे जाळेच आजच्या पिढीवर लादले जात आहे. अशा वेळी राष्ट्रसेवादल चे समानतेचे मानवतेचे आणि स्वतःला माणूस म्हणून घडविण्याचे विधायक विचार या शिबिरातून मिळतात. य शिबिरात सहभागी होणार शिबिरार्थीं म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन बाळगून समाज आणि जीवनभान जपणारी भविष्यातील पिढी आहे. जेष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर समारोपप्रसंगी शिबिरार्थीना संबोधित करताना म्हणाल्या की, आज सगळीकडे मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जमान्यात चांगले विचार ऐकण्याची आणि ते आत्मसात करण्यासाठी कुणाला फुरसत नाही.जो तो करिअरच्या मागे आणि रॅट रेसमध्ये दंग आहे.

या रॅट रेसमधून शाळकरी आणि कॉलेजमधील मुलेही सुटलेली नाहीत. या धावपळीत आपण माणूस म्हणून कसे जगावे ? या शिकवणीचा संस्कारच लोप होत चालला आहे.राष्ट्रसेवादल च्या शिबिरातून प्रत्येकाला भारत माझा देश आहे आणि मी या देशाचा हा विचार मिळतो. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मी आधी माणूस आहे ही सहिष्णुता शिकायला मिळते. स्त्री-पुरुष समानता म्हणजे नेमकं काय ? आपली कुटुंब, समाज आणि देशाप्रती जबाबदारी काय याचे भान आणि ज्ञान सुदधा या शिबिरातून कृतिशील मार्गाने मिळते.

शिबिरार्थीं स्वयंशिस्त बनतात. आजच्या ग्लोबल जमान्यात मानवतावादी दृष्टिकोन शिकवणाऱ्या आणि धर्म जाती च्या आधी माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या शिबिराचे आयोजन अद्वैत फाउंडेशन ने केले हे कौतुकास्पद असल्याचे उदगार कमलताई परुळेकर यांनी काढले. शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रसेवादलचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ म्हणाले,राष्ट्रसेवादलाच्या शिबिरात सर्व जातीधर्माची मुले एकत्र येतात.

जेव्हा सर्व जातीधर्माची मुले या शिबिरात एकत्र दिसतात तेव्हा मला अखंड भारताचे दर्शन होते असे साने गुरुजी म्हणत.आज शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, बेरोजगारी, वाढती महागाई या सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून भोंगे आणि अजान सारखे वायफळ प्रश्न उभे करून जातीधर्मांत तेढ निर्माण करून समाजात दुही माजवण्याचे काम सुरू आहे. अशा कलुषित वातावरणात राष्ट्रसेवादल शिबिर आयोजित करून आजच्या युवा आणि बालपिढीला आम्ही सर्व एक आहोत ही शिकवण देत आधी माणूस म्हणून जगुया हा संस्कार देण्याचे काम अद्वैत फाउंडेशन करत आहे. गोपुरी अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले की, मी आहे म्हणून आम्ही आहोत आणि आम्ही आहोत म्हणून मी आहे हा विचार या शिबिरातून मुलांना मिळाला. समानतेच्या विचारांचे बीज अद्वैत फाउंडेशन ने राष्ट्रसेवादल शिबिराच्या माध्यमातून रोवले आहे, त्याचे भविष्यात वृक्षात रूपांतर होईल. पालक आणि मुलांमध्ये निकोप सुसंवाद असणे गरजेचे आहे.

आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादण्याऐवजी मुलांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना करिअर करू द्या. या शिबिरातून पालकांना त्यांच्या मुलांचे नवीन आश्वासक रूप गवसले आहे हेच या शिबिराचे यश आहे. शिबीर सांगता प्रसंगी शिबिरार्थीनी सादर केलेल्या विविध कलागुणांनी उपस्थित भारावून गेले होते. प्रास्तविक सरिता पवार यांनी केले. सूत्रसंचालन चंदन माटूनगे यांनी केले तर आभार राजन चव्हाण यांनी मानले.

You cannot copy content of this page