देवबाग येथील कायमस्वरूपी बंधाऱ्याचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ…

मालवण दि प्रतिनिधी सागरी अतिक्रमणग्रस्त सर्जेकोट तळाशील येथील कायमस्वरूपी बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करून तेथील ग्रामस्थांना दिलासा देणाऱ्या मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सर्जेकोट तळाशील पाठोपाठ देवबाग येथे चार कोटी रुपये खर्चाच्या कायमस्वरूपी बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केला. राज्यशासनाच्या माध्यमातून देवबागच्या या बंधाऱ्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार असून गेले काही महिने हे काम सीआरझेडच्या परवानगी अभावी रखडले होते. मात्र आता या कामाला सुरुवात झाल्याने देवबागच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

मालवण तालुक्यातील देवबाग गावच्या किनारपट्टीची सागरी अतिक्रमणामुळे दरवर्षी पावसाळ्यात धूप होत असते. पावसाळा कालावधीत उसळणाऱ्या अजस्त्र लाटांमुळे अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होऊन ग्रामस्थांना भीतीच्या छायेखाली जगावे लागते. देवबाग किनाऱ्यावर असलेला जुना बंधारा लाटांच्या तडाख्यात उध्वस्त झाला आहे. याठिकाणी बंधारा व्हावा अशी मागणी देवबागवासीय गेली अनेक वर्षे करत आहेत. मात्र सीआरझेड, कांदळवनच्या परवानग्या मिळण्यात बराच कालावधी गेल्याने ही कामे मार्गी लागली नाहीत. मात्र या सर्व परवानग्या मिळाल्याने आज देवबाग मोबारवाडी येथील ५०० मीटरच्या धूपप्रतिबंधक बंधार्‍याच्या कामास प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. बंधारा बांधण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी शासन स्तरावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने देवबाग बंधाऱ्यासाठी ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. हा बंधारा ३.५ किलोमीटरचा असून त्यातील पहिला टप्पा हा ५०० मीटर एवढा असणार आहे. हा निधी पतन विभागाकडे वर्ग करण्यात आला असून सर्व प्रकारच्या मान्यतेनंतर या बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, नितीन वाळके, माजी नगरसेविका आकांशा शिरपूटे, पूनम चव्हाण, दीपा शिंदे, मनोज खोबरेकर, मंदार ओरसकर, नरेश हुले, स्वप्नील आचरेकर, प्रसाद आडवणकर, बाबी जोगी, बाळू नाटेकर, महेंद्र म्हाडगुत, किसन मांजरेकर, उमेश मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, रमेश कद्रेकर, अनिल केळुसकर, दर्शन बांदेकर, रुपेश सातार्डेकर, ग्रा.प. सदस्य यांच्यासह पतन विभाग कनिष्ठ अभियंता प्रमोद मोडक, कार्यकारी अभियंता सी. ए. आयरेकर, उपअभियंता पी. व्ही. पवार, सहाय्यक अभियंता समाधान जाधव, शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व देवबाग येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आम. वैभव नाईक म्हणाले, सर्जेकोट, तळाशील पाठोपाठ देवबाग येथील बंधार्‍याच्या कामास प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. देवबाग येथील बंधार्‍याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. सीआरझेडच्या परवानगी अभावी हे काम रखडले. आजपासून हे काम सुरू होत पुढील टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरवात होईल. परवानग्या मिळविण्यात विलंब होत असल्याने ही कामे रखडली होती. याबद्दल देवबागवासियांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे. येथील बंधार्‍याच्या कामासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

पावसाळ्यातील काही कालावधी वगळता या बंधार्‍याचे काम सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर खाडीकिनारी सात कोटी रुपयांचा बंधारा मंजूर असून त्यासाठी आवश्यक परवानग्या प्रस्तावित असून हे कामही लवकरच सुरू होईल असे आम. नाईक यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी जिओ ट्यूबचे बंधारे मंजूर झाले होते. हे बंधारे रद्द करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला असल्याचे आम. नाईक सांगितले.

You cannot copy content of this page