दोडामार्ग मध्ये मतदान शांततेत व सुरळीत पार

एकूण ६८.३१ टक्के इतके मतदान

*💫दोडामार्ग दि.१५ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. यात तेरवण-मेढे ६६.४२ टक्के, आयनोडे-हेवाळे येथे ८०.३९ टक्के व कुडासे येथे ६४.८० टक्के असे एकूण ६८.३१ टक्के इतके मतदान झाले. हे मतदान सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडले. कुडासेत शिवसेना व भाजप पुरस्कृत पॅनल तर तेरवण -मेढे मध्ये शिवसेना विरुद्ध ग्रामविकास व आयनोडे – हेवाळे मध्ये महाविकास विरुद्ध ग्रामविकास अशी लढत होत आहे . गेले काही दिवस या तिन्ही ठिकाणी परस्पर विरोधी पॅनलचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने प्रचार करत होते. सार्वत्रिक ग्रा.पं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तीन ग्रा.पं. मध्ये सकाळी ७:३० पासून एकूण आठ मतदान केंद्रावर मतदान झाले. हे मतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांचे बरोबर अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका यांनाही मतदान केंद्रावर कार्यरत करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची थर्मल मशीनद्वारे तपासणी करून सॅनिटायजर दिले जात होते. मतदान करताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.

You cannot copy content of this page