बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्रातील २५ लाख अपहारप्रकरणी दोघे निर्दोष

कणकवली ता.१८-:* कणकवली ,देवगड येथील बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्रात सुमारे 25 लाख रुपयांचा आर्थिक अपहार केल्याच्या आरोपातून बीएसएनएलचे तत्कालीन वरिष्ठ कार्यालयीन सहाय्यक निशीकांत अनंत सावंत (वाडा- देवगड) व बीएसएनएलचे अधिकृत वितरक उमेश केशव नेसवणकर (मिठमुंबरी- देवगड) यांची जिल्ह्याचे मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपी निशीकांत सावंत यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत तर नेसवणकर यांच्यावतीने अॅड. अजित भणगे, अॅड. मिहीर भणगे व अॅड. स्वप्ना सामंत यांनी काम पाहिले.

मार्च २०१० ते जून २०१० या कालावधीत बीएसएनएलच्या देवगड येथील ग्राहक सेवा केंद्रातील वरिष्ठ कार्यालयीन सहाय्यक निशीकांत सावंत यांच्या ताब्यात बीएसएनएलची सीमकार्ड व व्हाऊचर्स अधिकृत वितरक उमेश नेसवणकर यांना विक्री करण्यासाठी देण्यात आलेली होती.

मात्र, आरोपींनी संगनमत करून सदरची रक्कम बीएसएनएलच्या बँक अकाऊंटमध्ये जमा न करता त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला खोटा हिशोब देऊन फसवणूक करून २५ लाख २३ हजार ३३४ रुपयांचा अपहार केला. त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाचे मुख्य लेखाधिकारी अनंत सावंत यांनी हिशेबांचे लेखा परीक्षण सप्टेंबर २०१३ मध्ये केले. त्यामध्ये तत्कालीन जेटीओ श्री. अहिराव, श्री. डुकरे यांच्याकडेही चौकशी झाली.

उपलब्ध साठा व प्रत्यक्ष व्यवहार यात तफावत आढळली. लेखाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार तत्कालीन उपमंडल अधिकारी संभाजी सतरकर यांनी देवगड पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपींच्याविरूद्ध कागदोपत्री पुराव्यासह अपहाराची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी भादंवि कलम ४०९, ४२०, ४७७ क नुसार दाखल झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांनी आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र पाठविले होते. सुनावणीत सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, उपमंडल अभियंत्यांबाबत झालेला संशयास्पद तपास, तपाकामातील त्रुट्या आदीमुळे न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

You cannot copy content of this page