उमेदवार लाड यांनी अपघातातील जखमीला दाखल केले रुग्णालयात.*
मालवण दि गोळवण- कुमामे- डिकवल ग्रामपंचायत निवडणूकीची मतदान प्रकिया आज सुरू असतानाच दुपारच्या सत्रात गोळवण येथील मतदान केंद्रावर मतदान करून तिरवडे येथे कामावर परतत असताना अनिल बाळकृष्ण जाधव या ३५ वर्षीय मोटारसायकलस्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली हा अपघात घडल्याचे समजताच गोळवणचे माजी सरपंच आणि उमेदवार सुभाष लाड यांनी प्रसंगावधान राखत निवडणुकीपेक्षा कर्तव्याला महत्त्व देत जखमी अवस्थेतील श्री जाधव यांना गोळवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले एवढेच नव्हे मतदानाचा अंतिम टप्पा सुरू असताना श्री. लाड यांनी त्या जखमी मतदाराला उपचारासाठी पडवे येथील हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी हलविले आहे. दरम्यान, गोळवण येथे आलेल्या मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जि प सदस्य अशोक सावंत यांना ही घटना कळताच त्यांनीही धावाधाव करीत जाधव यांच्या उपचाराबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या मालवण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकी साठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. गोळवण ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ग्रामस्थ अनिल जाधव हे दुपारी मतदानाचा हक्क बजावून तिरवडे येथे आपल्या गवंडी कामासाठी जाण्यास मोटारसायकलने निघाले. तिरवडे नाका येथे जाधव हे आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांना हुल दिली. यामुळे जाधव यांचा मोटारसायकल वरील ताबा सुटून ते रस्त्यावर कोसळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच गोळवणचे माजी सरपंच व निवडणुकीतील उमेदवार सुभाष लाड यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी जाधव यांना ग्रामस्थांच्या मदतीने गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी जाधव यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, भाजपचे पदाधिकारी अशोक सावंत, छोटू सावजी यांनीही गोळवण आरोग्य केंद्रात येऊन जखमी जाधव यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. यानंतर अधिक उपचारासाठी जाधव यांना पडवे येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. सुभाष लाड यांनी गोळवण ग्रामपंचायत मध्ये सहा टर्म पूर्ण केल्या असून सरपंच पदही भूषविले होते. ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत ऐन मतदानाच्या दिवशी स्वतः उमेदवार असूनही गावातील जखमी ग्रामस्थाच्या सहकार्यासाठी धावत जात लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श त्यांनी नव्या उमेदवारांसमोर निर्माण केला आहे.
