*💫मालवण दि.१५-:* मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या भेटीवर आलेले आरोग्य सेवा विभागीय उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांची माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर व नागरिकांनी भेट घेत ग्रामीण रुग्णालयातील समस्यांबाबत लक्ष वेधले. रुग्णालयातील डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची पदे भरली जावीत, कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञ मिळावा, स्वच्छता व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे यासह ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे अशा विविध मागण्या यावेळी श्री. जावकर यांनी मांडल्या. उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणारी मोठी जागा उपलब्ध करून प्रस्ताव सादर करावा तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ साठी प्रस्ताव सादर करावा असे यावेळी हेमंतकुमार बोरसे यांनी सांगत इतर समस्यांबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या आरोग्य सेवा विभागाचे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याचे विभागीय उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांनी शुक्रवारी मालवण ग्रामीण रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. यामध्ये त्यांनी रुग्णालयातील वॉर्ड, रुग्ण सेवा, विभाग याबाबत पाहणी करून वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडून माहिती घेत चर्चा केली. यावेळी मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी नागरिकांसमवेत बोरसे यांची भेट घेत रुग्णालयाच्या समस्यांबाबत लक्ष वेधले. यावेळी सुधीर धुरी, विजय नेमळेकर, जयमाला मयेकर, बाबू डायस आदी उपस्थित होते. कोविड काळात नियमित सेवा देऊनही ग्रामीण रूग्णालयातील स्वच्छता कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षकांचे वेतन देण्यात आलेले नाही. ते देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ व सर्जन नसल्याने येथे एकाही गरोदर स्त्री ची डिलिव्हरी होत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञ मिळावा. तसेच रुग्णालयात बसविण्यात आलेली डायलिसिस यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करावी अशा मागण्या यावेळी महेश जावकर यांनी केल्या. तसेच मालवण पर्यटन शहर असल्याने येथील रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरित होण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे सांगत जावकर यांनी याप्रश्नी लक्ष वेधत उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी केली. यावर बोलताना उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांनी मालवणचे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरित करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता असून अशी जागा नगरपालिका अथवा अन्य संस्थांमार्फत उपलब्ध करून शासनास प्रस्ताव सादर करावा असे सांगितले. तर कायमस्वरुपी स्त्रीरोगतज्ज्ञ नियुक्त करण्यासाठी नागरिकांनी आपल्या मागणीचा तसेच रुग्णालय प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा, त्यानुसार स्त्रीरोगतज्ज्ञ नियुक्त करण्यात येईल असे आश्वासन बोरसे यांनी दिले. तर मराठा आरक्षणाबाबत असलेल्या स्थगितीमुळे शासनाकडून अनेक विभागातील बढत्या थांबविल्या असल्याने मालवण रुग्णालयातील वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात अडचणी येत असल्याचे बोरसे यांनी स्पष्ट केले. तर स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या थकीत वेतनाबाबत आपण माहिती मागवून योग्य ती कार्यवाही करू असेही त्यांनी सांगितले.
मालवण ग्रामीण रुग्णालयातील समस्यांबाबत वेधले आरोग्य सेवा उपसंचालकांचे लक्ष…
