महाराष्ट्रातही डबल इंजिनचे सरकार यावे – डॉ. प्रमोद सावंत

मालवण ता.१४-:* महाराष्ट्रात यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे कामकाज कसे चालायचे हे सर्वांनी पाहिले आहे. गोवा, कर्नाटक या महाराष्ट्राच्या लगत असलेल्या राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ जनतेपर्यंत पोहचविणे सुलभ होते. महाराष्ट्रातही लवकरच डबल इंजिनचे सरकार यावे, अशी भावना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केली. मालवण येथे आयोजित अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या ३२ व्या अधिवेशन निमित्ताने मालवण दौऱ्यावर आलेल्या गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मालवण भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे स्वागत करत भव्य सत्कार केला. यावेळी भव्य पुष्पहार आणि आंब्यांचा हार घालून डॉ. सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक गणेश कुशे, विजय केनवडेकर, उद्योजक डॉ. दीपक परब, विलास हडकर, विशाल परब, राजू आंबरेकर, आबा हडकर, राजू बिडये, जॉन नरोना, अजय शिंदे, दीपक सुर्वे, प्रकाश मेस्त्री, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, महेश सारंग, दाजी सावजी, भाई मांजरेकर, प्रमोद करलकर, दीपक सुर्वे, प्रकाश मेस्त्री, हरीश गावकर, महिला आघाडी शहर अध्यक्षा चारुशीला आचरेकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, पूजा वेरलकर, माधुरी बांदेकर, चित्रपट आघाडी महिला जिल्हाध्यक्ष नमिता गावकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने पक्षात कार्यरत राहणे महत्वाचे आहे. पद मिळो अथवा न मिळो कार्यकर्ता पद हे कायम सोबत आहे. आपणही भाजपात कार्यकर्ता म्हणून काम करताना विविध पदे भूषवली. कार्यकर्ता ते मुख्यमंत्री हा प्रवास भाजपामुळे शक्य झाला. जनतेचा पाठिंबा मिळाला, पक्षाने नेहमीच विविध जबाबदारी देऊन विश्वास दाखवला.

आज दुसरी टर्म मुख्यमंत्री म्हणून पक्षाने जबाबदारी दिली ती पार पाडत असताना केंद्रात सरकारच्या माध्यमातून प्रभावीपणे काम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान कामांमुळे अधिक ऊर्जा मिळते. आपल्या सारखी ऊर्जा महाराष्ट्रात मिळावी यासाठी येथेही डबल इंजिन सरकार गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर चांगले काम करत आहेत. गोवा राज्यातही त्यांनी गुंतवणूक करण्याची तयार दर्शवली आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जनहिताचे चांगले काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री सावंत या निमित्ताने यावेळी स्पष्ट केले. यावेळी निलेश राणे म्हणाले, भाजप कार्यालयाला भेट देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यालयाचे महत्व पटवून दिले आहे. मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांचा आदर्श कार्यकर्त्यांमध्ये आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांच्या साध्या राहणीमानाचे कौतुक वाटते. मुख्यमंत्री हा डॉ. सावंत यांच्या सारखा असावा. डॉ. सावंत यांच्या येण्याने कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. कुठे गोव्याचे मुख्यमंत्री आणि कुठे महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. बाहेर पडले तर काय बोलतात समजत नाहीत, असा टोलाही यावेळी निलेश राणे यांनी लगावला.

You cannot copy content of this page