मसुरे गाव भक्तिरसात न्हाऊन निघाला
मालवण दि प्रतिनिधी कोकणातील सर्वात मोठी गावराठी म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या मसुरे गावचे ग्रामदैवत, तीनशेसाठ खेड्यांचा अधिपती श्री भरतेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भरतेश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात भक्तांचा मेळा भरून सारे मसुरे गाव भक्तिरसात न्हाऊन गेले होते. कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत तीनशेसाठ खेड्यांचा अधिपती श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले असून मंदिराचा कलशारोहण सोहळा गेले चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. आज कलशारोहणाचा मुख्य समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त सकाळपासून मंदिरात शांतीपाठ, स्थलशुद्धी, स्थापितदेवता पूजन, मुख्य देवता हवन आदी धार्मिक विधी संपन्न झाले. तर भरतेश्वर मूर्ती सभोवती फुलमाळांची आरास तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यानंतर मंदिरावर मुख्य शिखरासह पाच कलशांचे आरोहण करण्यात आले.
मुख्य कलशाचे पूजन रणवीर संग्राम प्रभुगावकर याच्या हस्ते आणि कलशाचे आरोहण मधुकर प्रभुगावकर याच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मंदिरात शतकलश स्नान, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, आचार्य दीप पूजन आदी विधी पार पडल्यावर गाव गाऱ्हाणे करून भरतेश्वराची महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यास मसुरे गावातील ग्रामस्थांसह जिल्हाभरातील भाविकगण तसेच मसुरेतील मुंबई व पुणे स्थित चाकरमान्यांनी उपस्थिती दर्शवली. या सोहळ्यास सावंतवाडी संस्थांनचे राजे खेमराज सावंत भोसले यांनी उपस्थित राहत भरतेश्वराचे दर्शन घेतले.
यावेळी श्री देव जैन भरतेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते खेमराज सावंत भोसले यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब, ट्रस्ट उपाध्यक्ष महेश बागवे, प्रकाश परब, नगरसेवक सदा परब आशिष पेडणेकर आदी व इतर उपस्थित होते. यानिमित्त सायंकाळी सुश्राव्य भजने सादर झाली. तसेच रात्री पालखी सोहळा, महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम पार पडला. तसेच रात्री श्री देव भरतेश्वर नाट्य मंडळ मसुरे देऊळवाडा मुंबई यांचे यशवंत मानखे लिखित ‘माझे देवा’ हे नाटक सादर झाले. या नाटकास नाट्य रसिकांनी गर्दी करत आस्वाद घेतला. यानिमित्त १४ मे रोजी रात्री ९ वा. श्री देव भरतेश्वर नाट्य मंडळ यांचे बाळ कोल्हटकर लिखित दुरितांचे तिमिर जावो हे नाटक सादर होणार आहे.
