नांदगाव सर्व्हिस रस्ते,मिडल कट प्रश्नी उपोषण आंदोलन स्थगित

कोळंबा मंदिरांनजीक होणार तात्पुरता मिडल कट

कणकवली ता.१३-:* नांदगाव तिठा व ओटव फाटा येथील सर्व्हिस रस्ते करा,किंवा कोळंबा मंदिरांच्या समोर तात्पुरता मिडल कट द्यावा,या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रविराज ऊर्फ भाई मोरजकर यांच्यासह ग्रामस्थांनी आमरण उपोषण जाहीर केले होते.त्यानुसार मिडल कट येत्या दोन दिवसांत व सर्व्हिंस रस्ते होण्यासाठी नोटीस वाटप करण्याचे आश्वासन दिल्याने १४ मे रोजीचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आल्याचे भाई मोरजकर यांनी सांगितले.

या प्रश्नी प्रांताधिकारी वैशाली राजमाने,महामार्ग उपअभियंता अतुल शिवनिवार,नायब तहसीलदार श्री.नाईक यांनी मध्यस्थी करत तोडगा काढला आहे. नांदगाव व ओटव फाटा येथील सर्विस रस्त्यांचे काम जमिनीच्या मोबदल्यात पोटी रखडलेले आहे. यामुळे ग्रामस्थांसह प्रवाशांना व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पार्श्‍वभूमीवर नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी १४ मेला उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र तत्पूर्वीच प्रांताधिकारी कार्यालय व महामार्ग प्राधिकरणचे उप अभियंता अतुल शिवनिवार व कनिष्ठ अभियंता श्री. कुमावत यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी मिडल कट देण्याचे मान्य केले असून येत्या दोन दिवसात त्याच्यावर कारवाई होईल. तसेच रखडलेले सर्विस रस्ते देखील येत्या काळात मार्गी लावण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता अतुल शिवनिवार,प्रांताधिकारी यांनी दिले आहे.

दरम्यान, प्रत्यक्ष येऊन महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केलेली पाहणी, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत संबंधित प्रकल्पग्रस्तांना तातडीने मोबदल्याच्या नोटिसा व पुढील कारवाईसाठी प्रस्ताव पाठवून लवकरात लवकर कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भाई मोरजकर यांनी दिली.तसेच मागण्या मान्य न झाल्यास कणकवली प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण २४ मे नंतर करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page